तरवळ माचीवले वाडीत ग्रामस्थांची अनोखी एकजूट
रत्नागिरी:- कोरोनातील टाळेबंदीने शिक्षण बंद झाले. मुले घरातच राहीली. शिक्षणाचं एक वर्ष जवळजवळ वाया जाण्याची चिन्हे आहेत. मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी रत्नागिरी तालुक्यातील तरवळ माचीवलेवाडीतील ग्रामस्थ एकवटले आहेत. गावातीलच माजी विद्यार्थी, कला शिक्षक यांच्यासह माध्यमिक, प्राथमिक शिक्षकांच्या सहकार्याने कुणाच्या घरात तर रिकाम्याच्या वाडीतील सभागृहात, मंदिरात दिवसाचे दीड ते दोन शिकवण्या सुरु झाल्या आहेत. 5 ते 10 वीपर्यंतच्या सुमारे 70 हुन अधिक विद्यार्थी या शाळेत शिकत आहेत.
कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर यंदाचे शैक्षणिक सत्र अजुनही सुरु झालेले नाही. शाळा बंद पडल्या आहेत. ही बाबत लक्षात घेऊन माचिवले वाडीमधील मुलांना शिक्षण मिळावे या हेतूने ग्रामस्थांनी पुढाकार घेतला. गावातील घरांच्या अंगणात शाळा भरविण्याचा निर्णय घेतला आहे. 5 वी ते 10 वी पर्यंत वर्ग सुरु करण्यात आले आहेत. यासाठी महादेव माचिवले, विजय माचिवले, शशिकांत माचिवले, संजय माचिवले व सर्व ग्रामस्थांनी पावले उचलली. या मुलांना शिकवणार कोण असा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यासाठी उच्च शिक्षीत माजी विद्यार्थी सरसावले. त्यात दत्तू मायंगडें, अक्षय माचिवले, महेश माचिवले ,विश्वेश्वर माचिवले, चेतन माचिवले, तृप्ती (गुड्डी) माचिवले, सागर माचिवले या सर्व माजी विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. ते सर्वजणं विद्यार्थ्याना अभ्यास शिकवत आहेत. मुंबईस्थित कला शिक्षक अर्जुन माचिवले हे सध्या कोरोनातील टाळेबंदीमुळे गावाकडे आलेले आहेत. गावातील शिकवणीचे नियोजन अर्जुन यांच्या मार्गदर्शनाखाली केले जाते.
कोरोनामुळे सोशल डिस्टन्सिंग महत्त्वाचे आहे. बाहेरुन शिक्षक येऊन शिकवण सध्या तरी शक्य नाही. शाळांमध्ये एकत्रीत शिकवण्यासाठी परवानगी नाही. त्यामुळे गावातीलच कुणाच्या घराच्या अंगणात, गावातील मंदिरात, रिकाम्या सभागृहात हे वर्ग भरवले जात आहते. दीड ते दोन तासांचा अभ्यास घेतला जात आहे. या संकल्पनेमुळे शिक्षणापासून दुर राहीलेली मुले पुन्हा प्रवाहात आलेली आहेत. माजी विद्यार्थ्यांना शिकवणीचा अनभुव नाही. त्यांच्यासाठी जाकादेवी येथील माध्यमिक शाळेचे शिक्षक मार्गदर्शन करत आहेत. सध्या माजी विद्यार्थ्यांना फुल ना फुलाची पाकळी मिळावी यासाठी गावातील लोकच वर्गणी काढत आहेत. त्यातूनच मानधन देण्याचा विचार सुरु आहे.









