गरमीच्या कालावधीत रत्नागिरीत पसरली धुक्याची चादर

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरात गुरुवारी सकाळी निसर्गाचे एक अनोखे आणि अनाकलनीय रूप पाहायला मिळाले. मार्च महिना सुरू असल्याने एकीकडे वाढत्या उष्णतेमुळे रत्नागिरीकर घामाघूम होत असतानाच, गुरुवारी अचानक पहाटेपासून शहरात दाट धुक्याची चादर पसरली होती. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पडलेल्या या धुक्यामुळे नागरिक आश्चर्यचकित झाले. अनेक ठिकाणी तर दाट धुक्यात रस्तेच गायब झाले होते.

गुरुवारी सकाळी पडलेले हे धुके इतके दाट होते की समोरचे रस्तेही स्पष्ट दिसत नव्हते. विशेष म्हणजे, या धुक्याला एक विशिष्ट प्रकारचा उग्र वास येत असल्याचे अनेकांनी अनुभवले. यामुळे हे धुके नैसर्गिक आहे की काही रासायनिक प्रदूषण, याबाबत नागरिकांनी वेगवेगळे तर्कवितर्क लढवण्यास सुरुवात केली. काहींनी तर सध्याच्या जागतिक युद्धजन्य परिस्थितीचे हे परिणाम असावेत, अशी भीतीही बोलून दाखवली.

या संदर्भात हवामान तज्ज्ञांशी चर्चा केली असता, त्यांनी हे नैसर्गिक ‘धुके’च असल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या मते, या बदलामागे खालील तांत्रिक कारणे असू शकतात असे मत व्यक्त केले. मागील दोन दिवसांत रत्नागिरीच्या तापमानात अचानक मोठी वाढ झाली. हवेतील आर्द्रता आणि उष्णतेचे प्रमाण वाढल्याने हे दाट धुके निर्माण झाले असावे असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

रत्नागिरी परिसरातील कारखान्यांमधून निघणारा धूर आणि त्यातील रसायने या धुक्यामध्ये मिसळली गेल्याने त्याला एक प्रकारचा उग्र वास आला असावा. जेव्हा हवेची हालचाल मंद असते, तेव्हा हे प्रदूषक धुक्यात अडकून जमिनीलगत राहतात, ज्यामुळे असा वास जाणवतो.

नेहमी हिवाळ्यात दिसणारे धुके मार्च महिन्यात दिसल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. याचा परिणाम रस्ते वाहतुकीवरही काही काळ जाणवला. वाहनचालकांना हेडलाईट्स लावून प्रवास करावा लागला. दरम्यान, हे केवळ स्थानिक हवामानातील बदलामुळे झाले असून घाबरण्याचे कारण नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.