मागील वर्षी ६ जूनपर्यंत जिल्ह्यात तब्बल ५७५.४० मि.मी. पाऊस, यंदा अवघा ८२.६० मि.मी. नोंद
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात यंदा मान्सूनपूर्व आणि खरीप हंगामाच्या सुरुवातीच्या पावसाने ओढ दिली असल्याचे स्पष्ट चित्र समोर आले आहे. शासनाच्या ‘महावेध’ प्रणालीकडून प्राप्त झालेल्या ६ जून २०२६ पर्यंतच्या अधिकृत आकडेवारीनुसार, जिल्ह्यात यंदा पावसाची गती अत्यंत मंद आहे. गतवर्षीच्या (२०२५) तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण कमालीचे घटले असून, यामुळे बळीराजा चिंतेत सापडला आहे आणि भात शेतीच्या कामांना अद्याप अपेक्षित वेग आलेला नाही.
६ जून २०२६ पर्यंतच्या अहवालानुसार, संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात सरासरी केवळ ८२.६० मि.मी. एकूण पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी याच मुख्य कालावधीत (१ जून ते ६ जून २०२५) जिल्ह्यात तब्बल ५७५.४० मि.मी. पाऊस झाला होता. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात केवळ १४% पाऊस झाला आहे. वार्षिक सरासरीच्या टक्केवारीचा विचार केला असता, गतवर्षी या वेळेस १.९०% पाऊस झाला होता, तर यंदा तो अवघा ०.२७% इतका नोंदवला गेला आहे.
जिल्ह्यात ६ जून रोजी सर्वाधिक पाऊस राजापूर तालुक्यात ७.४० मि.मी. इतका नोंदवला गेला, तर लांजा, संगमेश्वर, आणि मंडणगड या तालुक्यांमध्ये ६ जून रोजी पावसाने पूर्णपणे पाठ फिरवली. लांजा तालुक्यात या हंगामात आतापर्यंत २२.०० मि.मी. तर राजापूरमध्ये १६.४० मि.मी. पाऊस झाला आहे. सर्वात चिंताजनक परिस्थिती उत्तर रत्नागिरीतील मंडणगड तालुक्याची असून, तिथे अजूनही पावसाचे खाते उघडलेले नाही.
रत्नागिरी जिल्ह्यातील मुख्य पीक असलेल्या भात शेतीसाठी जूनचा पहिला आठवडा अत्यंत महत्त्वाचा असतो. सामान्यतः या काळात शेतकरी धूळपेरणी किंवा गादीवाफ्यांवर बियाणे टाकण्याचे काम पूर्ण करतात. परंतु, पावसाअभावी शेतात पुरेशी ओल नसल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या थांबवणे पसंत केले आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवसांत कोकणात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असली, तरी सद्यस्थिती पाहता खरीप हंगाम काहीसा लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत.
कृषी विभागाने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, शेतकऱ्यांनी घाईघाईने पेरण्या उरकू नयेत. जमिनीत किमान ७५ ते १०० मि.मी. पाऊस पडून पुरेशी ओल निर्माण झाल्याशिवाय आणि हवामान विभागाने मुख्य मान्सून सक्रिय झाल्याची पुष्टी केल्याशिवाय बियाणे पेरू नये, जेणेकरून दुबार पेरणीचे संकट टळेल.









