१६ वैद्यकीय पथकांद्वारे ४३५ रुग्णांवर उपचार; आरोग्य यंत्रणा सतर्क
रत्नागिरी:- गणेशोत्सवाच्या काळात कोकणात विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात चाकरमान्यांची होणारी अलोट गर्दी लक्षात घेता, संसर्गजन्य आजारांचा फैलाव रोखण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने कंबर कसली आहे. जिल्ह्यात दाखल होणाऱ्या प्रवाशांच्या माध्यमातून कोणत्याही आजाराचा प्रसार होऊ नये, यासाठी विशेष खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील प्रमुख प्रवेशद्वारांवर, रेल्वे स्थानकांवर आणि बसस्थानकांवर १६ वैद्यकीय पथके तैनात करण्यात आली आहेत. १० सप्टेंबरपासून सुरू झालेल्या या धडक मोहिमेअंतर्गत आतापर्यंत एकूण ४३५ प्रवाशांची कसून आरोग्य तपासणी करण्यात आली असून, लक्षणे आढळलेल्या रुग्णांवर तात्काळ औषधोपचार करण्यात आले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील लाखो नागरिक नोकरी आणि व्यवसायानिमित्त मुंबई, ठाणे, पुणे आणि इतर महानगरांमध्ये वास्तव्यास आहेत. बाप्पाच्या आगमनाला हे सर्व चाकरमानी मोठ्या संख्येने गावी येतात. मात्र, मोठ्या शहरांमधून येणाऱ्या प्रवाशांसोबत विविध संसर्गजन्य आजार ग्रामीण भागात पसरण्याची दाट शक्यता असते. हीच बाब लक्षात घेऊन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाने ही प्रतिबंधात्मक उपाययोजना आखली आहे.
आरोग्य पथकांनी खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर या प्रमुख तालुक्यांतील अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी नाकेबंदीसारखी आरोग्य तपासणी केंद्रे उभारली आहेत. यामध्ये खेड तालुक्यातील भरणे नाका, दाभीळ फाटा व रेल्वे स्टेशन; चिपळूणमधील पेढे-सवतसडा दर्शन, कळंबस्ते तिठा, बहादूरशेख नाका, रेल्वे स्टेशन, संगमेश्वरमधील एस.टी. स्टँडजवळील पूल व देवरुख-मुर्शी चेकपोस्ट; रत्नागिरी तालुक्यातील मध्यवर्ती हातखंबा तिठा व रेल्वे स्टेशन; लांजा येथील वेरळ व कुवे गणपती मंदिरासमोरील परिसर आणि राजापूर येथील एस.टी. स्टँड अशा मोक्याच्या १६ ठिकाणांचा समावेश आहे.
गेल्या काही दिवसांत झालेल्या तपासणीदरम्यान प्रामुख्याने सर्दी, खोकला, विशेष ताप, कावीळ आणि अतिसार-हगवण यांसारख्या आजारांचे तसेच काही इतर किरकोळ आजारांचे रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य पथके केवळ प्राथमिक तपासणी आणि औषधोपचार करून थांबत नसून, संशयित रुग्णांचे नमुने संकलन करणे आणि गरजेनुसार त्यांना पुढील उपचारासाठी संदर्भ सेवा देण्याचे कामही करत आहेत.
या मोहिमेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ‘ट्रेसिंग’ यंत्रणा. तपासणी दरम्यान आजारी आढळणाऱ्या रुग्णांकडून ते नेमक्या कोणत्या गावात जाणार आहेत आणि तिथे किती दिवस मुक्काम करणार आहेत, याची संपूर्ण माहिती नोंदवून घेतली जात आहे. संबंधित रुग्ण ज्या गावात जाणार आहे, तिथल्या स्थानिक आरोग्य केंद्राला आणि कर्मचाऱ्यांना तातडीने पूर्वकल्पना देऊन सतर्क केले जात आहे, जेणेकरून त्या रुग्णावर त्याच्या गावातही लक्ष ठेवता येईल.
गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणीत करताना आरोग्याची काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे. त्यामुळे जिल्ह्यात दाखल होणाऱ्या कोणत्याही चाकरमान्याला ताप, सर्दी, खोकला, अतिसार, उलट्या किंवा कावीळ यांसारखी कोणतीही लक्षणे आढळल्यास त्यांनी स्वतःच्या मनाने औषधे न घेता जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करून घ्यावी. आजारपण लपवून न ठेवता आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा, असे कळकळीचे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती अस्मिता केंद्रे, उपाध्यक्ष विलास चाळके, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी केले आहे.









