गणपतीपुळे:- रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथे देवदर्शन व पर्यटनासाठी मुंबईहून आलेल्या पर्यटकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवार, १७ डिसेंबर रोजी रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास घडली.
अनिल लक्ष्मण पाथरे (वय ५७, रा. साकीनाका, मुंबई) असे मृत पर्यटकाचे नाव आहे. अनिल पाथरे हे दीपक पांडुरंग लाटे (वय ५४) आणि चंद्रकांत नामदेव विरखडे (वय ५८) यांच्यासह १७ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास गणपतीपुळे येथे आले होते. देवदर्शन व पर्यटनानंतर त्यांनी गणपतीपुळे येथील एका खाजगी हॉटेलमध्ये जेवण केले व नंतर मुक्कामासाठी एका खाजगी लॉजमध्ये गेले.
लॉजवर पोहोचल्यानंतर अनिल पाथरे यांना अचानक उलट्या व तीव्र अशक्तपणा जाणवू लागला. त्यानंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना तात्काळ गणपतीपुळे येथील एका खाजगी दवाखान्यात नेले. मात्र तेथे डॉक्टर उपलब्ध नसल्याने त्यांना त्वरित गणपतीपुळेनजीकच्या मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक तपासणीनंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. सौ. पवार यांनी त्यांना मृत घोषित केले.
यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जाकादेवी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला. या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद जयगड सागरी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गणपतीपुळे क्षेत्रातील पोलीस कर्मचारी अनिल गुरव व संदीप साळवी करीत आहेत.









