रत्नागिरी:- हरियाणा येथे २०२२ मध्ये होणार्या चौथ्या खेलो इंडीया युथ गेम्स करीता खो-खो, कबड्डी आणि बास्केटबॉलच्या मुलींचे महाराष्ट्राचे संघ निवड करावयाचे आहेत. त्यासाठी तिन्ही खेळांचे रत्नागिरी जिल्ह्याचे संघ निवडण्यात येणार आहे. या खेळांच्या स्पर्धा व निवड चाचणी २३, २४, २५ नोव्हेंबरला होणार आहेत.
चौथ्या खेलो इंडीया युथ गेम्ससाठी खो – खो १८ वर्षाखालील मुले व मुली, कबड्डी १८ वर्षांआतील मुले ७० किलो व त्याखालील वजनी खेळाडू) आणि मुली (६५किलो व त्याखालील वजनी खेळाडू), बास्केटबॉल १८ वर्षांआतील मुली हे वयोगट ठेवण्यात आले आहेत. या स्पर्धेकरीता सहभागी होणारा खेळाडू हा १ जानेवारी २००३ रोजी व त्यानंतर जन्मलेला असावा. तसेच खेळाडूंनी आधार कार्ड, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (१० वी बोर्ड सर्टीफिकेट), जन्म प्रमाणपत्र यापैकी दोन कागदपत्रे आणणे आवश्यक आहेत. जिल्हास्तरीय स्पर्धेकरीता शाळा किंवा क्लबच्या संघांना प्रवेश देण्यात येईल. शाळाबाह्य तसेच संघातुन सहभागी होऊ न शकणार्या खेळाडूंना निवड चाचणीकरीता संधी मिळेल. या स्पर्धेचे आयोजन त्या-त्या खेळाच्या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या नियमानुसार आणि जिल्हा संघटनेच्या सहकार्याने घेण्यात येणार आहेत. जिल्हा व विभागीय स्पर्धेतील विजयी संघ व पराभूत संघातील उत्कृष्ट खेळाडू आणि निवड चाचणीसाठी आलेल्या खेळाडूंमधुन ५ खेळाडूंची निवड पुढीलस्तरासाठी करण्यात येईल. ही स्पर्धा व निवड चाचणीचे आयोजन खेलो इंडीया युथ गेम्ससाठी राज्य संघ निवड करण्याकरीता करण्यात येत असल्याने सहभागी खेळाडूंना कोणत्याच स्तरावर प्रमाणपत्र देण्यात येणार नाही.









