रत्नागिरी:- खेलो इंडिया राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महिलांच्या विविध गटामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील पाचजणींची निवड झाली आहे. कोरोनानंतर झालेल्या स्पर्धांमधून रत्नागिरीच्या या खेळाडूंनी राज्य व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन केल्यानंतर या खेळाडूंची निवड झाली आहे.
खेलो इंडिया राष्ट्रीय महिला खो-खो लीग स्पर्धा 16 ते 19 जानेवारी दरम्यान झारखंड मधील रांची होतवार येथे अल्बर्ट एक्का खो-खो स्टेडियमवर होत आहे. किशोरी व 18 वर्षाखालील मुलींच्या गटाची स्पर्धा होणार आहे. यासाठी किशोरी गटात रत्नागिरीतील मृण्मयी नागवेकर व साक्षी लिंगायत या दोन खेळाडूंची निवड झाली आहे. याच ठिकाणी होणार्या 18 वर्षाखालील मुलींच्या संघात महाराष्ट्राकडून पायल पवार हिची निवड झाली आहे.
खेलो इंडिया राष्ट्रीय महिला खो खो लीग स्पर्धा 10 ते 13 जानेवारीदरम्यान चंदिगड येथे चंदिगड युनिवर्सिटी येथे पार पडल्या. यामध्ये रत्नागिरीची ऐश्वर्या सावंत व श्रेया सनगरे यांची निवड झाली होती.
कोरोनानंतर मैदानी खेळांना परवानगी मिळाल्यानंतर रत्नागिरीला किशोर-किशोरी पहिली राज्यस्तरीय स्पर्धा भरवण्याचा मान मिळाला होता. या स्पर्धेवर रत्नागिरीच्या खेळाडूंनी छाप पाडली. राष्ट्रीय प्रशिक्षक पंकज चवंडे यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरीच्या खेळाडूंनी मोठी झेप घेतली आहे.
निवड झालेल्या खेळाडूंचे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष किरण सामंत, राज्य खो खो असो. चे माजी सचिव संदीप तावडे, जिल्हा खो खो असोसिएशनचे अध्यक्ष बाळू साळवी, प्रशिक्षक प्रसाद सावंत, राजेंद्र चव्हाण यांनी अभिनंदन केले.









