रत्नागिरी:- शहरानजीकच्या खेडशी येथील लॉजवरील वेश्या व्यवसाय प्रकरणातील संशयिताने राहत्या घरी फिनेल प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना गुरुवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. अरमान करीम खान (२४, रा. कोकणनगर रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे.
अरमान हा नुकताच जामिनावर बाहेर आला होता. घरी आल्यानंतर त्याने प्रेयसीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने काडीमोड केल्याने त्याला मानसिक धक्का बसला. यातूनच त्याने आत्महत्येचे पाऊल उचलल्याचे पोलिसांना दिलेल्या जबानीत म्हटले आहे. दरम्यान नातेवाईकांनी अरमानला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. शहरानजीकच्या खेडशी येथे रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे यांच्या संयुक्त कारवाईने देह व्यापारांचा प्रकार उघड झाला होता. १३ मे रोजी रात्रीच्या सुमारास ही कारवाई केली होती.
पोलिसांनी देह व्यापार करणाऱ्या चार महिलांना ताब्यात घेतले होते. तसेच या अनैतिक व्यापारप्रकरणी अरमान खान याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तसेच त्याच्याविरुद्ध रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून अरमान हा कारागृहात होता.
दरम्यान अरमानचे एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. अरमान देह व्यापारसारख्या गंभीर गुन्ह्यात अडकल्याने तिला जबर मानसिक धक्का बसला होता. अरमान हा काही दिवसांपूर्वी २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर कारागृहातून बाहेर आला होता. घरी आल्यानंतर त्याला प्रेयसीचे लग्न ठरल्याचे समजले. यामुळे तिने काडीमोड घेतल्याने अरमान याला मानसिक धक्का बसला. प्रेमभंगातून निराश झालेल्या अरमानने २४ जुलै रोजी आपल्या मित्राला घरी बोलावले होते. तसेच तुझ्याशी मला बोलायचे आहे, असे सांगितले. त्यानुसार त्याचा मित्र घरी आला होता. यावेळी अरमानने आपल्या प्रेयसीचे लग्न ठरल्याचे सांगत आपल्या भावना त्याच्यापुढे व्यक्त केल्या. यानंतर दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास अरमान हा बाथरुममध्ये गेला. यावेळी त्याने बाथरुममध्ये ठेवलेले फिनेल प्राशन केले. अरमानला उलट्या होवू लागल्याने त्याचा मित्र धावत बाथरुममध्ये आला असता त्याला अरमान याने फिनेल प्राशन केल्याचे दिसून आले. अरमानच्या मित्राने ही खबर त्याच्या नातेवाईकांना दिली. त्यानंतर नातेवाईक दाखल झाले. अरमानला रुग्णालयात उपचारासाठी दाखल होण्याबाबत सांगण्यात आले.
मात्र अरमान हा आपल्याला उपचार घ्यावयाचे नाहीत, असा हट्ट करुन बसला. अखेर नातेवाईकांनी समजूत काढल्यानंतर अरमानला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलिसात करण्यात आली आहे.