रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. शहरातील क्रांतीनगर येथील कचरा डेपोमध्ये केवळ दोन दिवसांचे नवजात पुरुष जातीचे अर्भक जिवंत अवस्थेत आढळून आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कचरा डेपोच्या परिसरात हे अर्भक पडल्याचे काही लोकांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने याची माहिती शहर पोलिसांना दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि त्या चिमुरड्याला स्थानिकांच्या मदतीने ताब्यात घेतले. सुदैवाने हे अर्भक जिवंत असून पोलिसांनी त्याला तातडीने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.
सध्या या बालकाला रुग्णालयातील लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. दरम्यान, पोटच्या गोळ्याला अशा प्रकारे उघड्यावर सोडून देणाऱ्या निर्दयी माता-पित्याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर आहे. रत्नागिरी शहर पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि रुग्णालयातील नोंदी तपासल्या जात आहेत. या घटनेने परिसरात संताप व्यक्त होत असून अशा कठोर काळजाच्या पालकांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.









