रत्नागिरी:- तालुक्यातील कोळंबे येथील पऱ्यामधील डोहात बुडून कल्याण-मुंबईतील दोन मुलांचा मृत्यू झाला. गुरुवारी (ता. ८) सायंकाळी 4 वाजण्याच्या दरम्यान हा अपघात घडला.पूर्णगड पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून पुढील कार्यवाही सुरू आहे.
सौरव पवनकुमार झा (वय १६) आणि शुभम रमेश यादव (वय १६, रा, कल्याण-मुंबई) अशी मृत मुलांची नावे आहेत. कोळंबे येथे गेल्या तीन दिवसांपासून १६ वर्षाखालील मुलांचे क्रिकेट सामने आहेत. यासाठी कल्याण येथील एका क्रिकेट अॅकॅडमीचे २० जणांची टीम खेळण्यासाठी आली होती. आज दुपारी या टीमचा सामना संपल्यानंतर त्यापैकी सौरभ आणि शुभम हे दोघे क्रिकेट मैदानाच्या बाजूलाच असलेल्या पऱ्यात पोहण्यासाठी गेले. मुळात हा डोह अतिशय धोकादायक आणि जंगलात असल्याने स्थानिकांनी एक नाही तर दोन ते तीन बंदी घातल्याचे बोर्ड लावले आहेत. परंतु त्याकडे दुर्लक्ष करून या दोन्ही मुलांना डोहामध्ये पोहण्याचा मोह आवला नाही. अन्य सहकाऱ्यांबरोबर ते त्या डोहाकडे गेले आणि त्यांनी त्या डोहामध्ये उडी मारली ते वर आलेच नाही. त्यामुळे सहकारी मुले प्रचंड घाबरली. त्यांनी आरडाओरड सुरू केल्यानंतर स्थानिक काही लोक आले. परंतु तोवर त्या मुलांना बाहेर काढण्यास काही कालावधी गेला. जेव्हा मुलांना बाहेर काढले तेव्हा त्यांच्या चेहऱ्याला जखमा असल्याचे दिसून आले. त्यावरून ते उडी मारल्यानंतर दगडावर आदळुन त्यांना मृत्यू झालाच्या प्राथमिक अंदाज पोलिसांनी बांधला आहे.
याची माहिती पूर्णगड पोलिसांना दिल्यानंतर काही वेळेतच ते घटनास्थळी दाखल झाले. मुलांना ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात आणले. याबाबत पोलिस अधिक तपास करत आहे. या घटनेची माहिती नातेवाईकांना देण्यात आली आहे.









