एकाच वेळी गणेशमुर्ती नेण्यासाठी गर्दी होवू नये यासाठी गणेशमूर्ती शाळांकडूनही घेतली जातेय खबरदारी
रत्नागिरी:- कोकणी माणूस आणि गणेशोत्सव यांचं एक वेगळं नातं आहे. दरवर्षी गणेशमूर्तीचं आगमन ते विसर्जन अगदी वाजत-गाजत केलं जातं. पण यावर्षी कोरोनाचं संकट असल्याने सध्या सोशल डिस्टसिंगला महत्व आलं आहे. त्यामुळे हेच महत्व ओळखून गणेशमुर्ती पाच ते सहा दिवस आधीच घरी नेण्यास सुरवात झाली आहे. एकाच वेळी गणेशमुर्ती नेण्यासाठी गर्दी होवू नये म्हणून गणेशमुर्ती कारखानदार ही खबरदारी घेत आहेत आणि गणेशभक्तही याला चांगला प्रतिसाद देत आहेत.
देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही असलेला कोकणी माणूस गणेशोत्सवासाठी दरवर्षी या सणाला आपल्या गावी अगदी हमखास येतो. पण यावर्षी काहीशी परिस्थिती वेगळी आहे. सध्या कोरोनाचं संकट आहे, त्यामुळे गणेशोत्सवाबाबतही सरकारने काही नियमावली जाहीर केली आहे. याबाबत गणेशमूर्ती कारखानदरही खबरदारी घेत आहेत. अनेक भाविक गणेशमूर्ती आगमन दरवर्षी आपल्या घरी गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी किंवा किंवा प्रतिष्ठापणेच्या दिवशी करत असतात, पण यावर्षी कोरोनाचं संकट असल्याने एकाच वेळी कारखान्यात गर्दी होऊ नये यासाठी काही दिवस अगोदर टप्प्याटप्प्याने भाविकांना मूर्ती नेण्यास बोलावण्यात येत आहे. गणेशमुर्ती शाळेतून बाप्पा घरी नेण्यासाठी वेळा ठरवून दिल्या आहेत. दरोराज एकेका गणेशमुर्ती शाळेतून 25 ते 50 गणपतीच्या मुर्ती भाविक आपल्या घरी नेताना पाहायला मिळत आहे. पण गर्दी न करता, सर्व नियम पाळून बाप्पाच्या जयघोषात या मूर्ती नेल्या जात आहेत.









