कोमसापचे विश्वस्त अरुण नेरुरकर यांचे दुःखद निधन

रत्नागिरी:- नगर वाचनालयाच्या कार्यात मोठा वाटा असलेले तसेच कोकण मराठी साहित्य परिषदेच्या स्थापनेपासून संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्यासोबत संस्था वाढविण्यात महत्वाची भूमिका बजावणारे कोकण मराठी साहित्य परिषदेचे विश्वस्त अरुण अच्युत नेरुरकर यांचे मंगळवारी पहाटे दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. मागील काही दिवस ते वृद्धापकाळमुळे आजारी होते.

मागील अनेक वर्षे रत्नागिरीच्या साहित्य क्षेत्रात आणि इतर क्षेत्रात कार्यरत राहून अरुण नेरुरकर यांनी सांस्कृतिक वाटचालीत मोलाचे योगदान दिले आहे. रत्नागिरी नगर वाचनालयाच्या कार्यातही त्यांनी मोलाचा वाटा उचलला होता. रत्नागिरी नगर वाचनालयाच्यावतीने झालेल्या साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजनात त्यांचा मोलाचा वाटा होता. आपल्या मृदू स्वभावामुळे त्यांनी अनेक संस्था आणि व्यक्ती जोडल्या होत्या त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र दुःख व्यक्त करण्यात येत आहे. त्यांची अंत्ययात्रा मंगळवारी सांयकाळी ४ वाजता त्यांच्या रत्नागिरी येथील पोलीस हेडकॉटर समोरील राहत्या घरातून निघणार आहे.

अरुण नेरुरकर यांच्या जाण्याने कोमसापचा आधारस्तंभ हरपला: नमिता कीर

कोकण मराठी साहित्य परिषदेचे विश्वस्त, संस्थापक सदस्य अरुण नेरुरकर यांच्या निधनाने कोमसापसह साहित्य क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या स्थापनेपासून आदरणीय मधुभाईंबरोबर सतत कार्यरत असलेले, संस्थेचा आधारस्तंभ असलेले नेरुरकर सरांच्या जाण्याने कोमसाप परिवाराचा सर्वाना जोडून ठेवणारा महत्वाचा दुवा निखळल्याची जाणीव मनाला पोरकं करून गेली. संपूर्ण कोकणात विशेष म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यात कोमसाप सर्वार्थाने उभी केली ती म्हणजे नेरुरकर सरांनी. कोमसापचा हा साहित्य प्रवाह सशक्त राहील, यासाठी तशीच सक्षम साहित्यप्रेमींची टीमदेखील उभी करण्याचं काम या वयापर्यंत अव्याहतपणे नेरुरकर सरांनी केलं. काही दिवसांपूर्वीच ते आजारी असताना भेट झाली. ती शेवटची. त्यांची ती अवस्था पाहून खूप वाईट वाटले. त्यांनी कोमसाप च्या आम्हा सर्वांना अखेरपर्यंत मार्गदर्शन केलं, माया दिली, सूचना देखील केल्या अशी प्रतिक्रिया कोमसापच्या केंद्रीय अध्यक्ष नमिता कीर यांनी दिली.