Wednesday, May 20, 2026
spot_img
Home राजकीय कोकण विधान परिषदेच्या जागेसाठी शिवसेना-राष्ट्रवादी आमने- सामने

कोकण विधान परिषदेच्या जागेसाठी शिवसेना-राष्ट्रवादी आमने- सामने

अनिकेत तटकरे, विकास गोगावले, राजन साळवी इच्छुक

रत्नागिरी:- राज्यातील विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून त्यामध्ये कोकण विधान परिषदेच्या जागेवरून आता मोठी रस्सीखेच पाहायला मिळत आहे. कोकणच्या जागेसाठी शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये चढाओढ दिसत आहे. या एका जागेसाठी सुनील तटकरे यांचे सुपुत्र अनिकेत तटकरे, शिंदे सेनेचे राजन साळवी आणि ना. भरत गोगावले हे आपले सुपुत्र विकास गोगावले यांच्यासाठी आग्रही आहेत. यामुळे कोकण विधान परिषदेच्या जागेसाठी राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेत चढाओढ पहायला मिळत आहे.

एकीकडे भरत गोगावले आपल्या सुपुत्रासाठी या जागेसाठी आग्रही दिसत असताना दुसरीकडे ही जागा राष्ट्रवादीला मिळावी यासाठी खासदार सुनील तटकरे यांनी ताकद लावल्याची माहिती आहे. सुनील तटकरे हे त्यांचे सुपुत्र अनिकेत तटकरे यांच्यासाठी आग्रही आहेत. त्याचवेळी शिवसेनेकडून माजी आमदार राजन साळवी यांचे नावदेखील चर्चेत आहे. त्यामुळे कोकणच्या जागेवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये पुन्हा एकदा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.

संख्याबळाच्या हिशोबाने कोकण विभागात शिंदेंच्या शिवसेनेचे पारडे जड असल्याचं मानलं जात आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचे एकूण 831 मतदार सदस्य आहेत. त्यामध्ये एकट्या शिंदेच्या शिवसेनेच्या सदस्यांचे 236 इतकं संख्याबळ आहे. त्याचमुळे शिवसेना या मतदारसंघावर दावा सांगत आहे.

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 16 जागांसाठी निवडणूक होत आहे. यातील दोन जागांवर राष्ट्रवादी इच्छुक आहे. रायगड रत्नागिरी आणि पुणे या दोन जाागंवर राष्ट्रवादीचा दावा आहे. रायगड रत्नागिरीतून माजी आमदार अनिकेत तटकरे, राजीव साबळे, अजित यशवंतराव हे इच्छुक आहेत. राजीव साबळे यांनी सुनेत्रा पवारांची भेटही घेतली आहे. अजित यशवंतरावही सुनेत्रा पवारांना भेटीला पोहचले.

तर पुण्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेवर निवडणूक लढण्यास माजी आमदार सुनील टिंगरे, विक्रम काकडे, माजी आमदार रमेश अप्पा थोरात, माजी आमदार विलास लांडे, नाना काटे हे इच्छुक आहेत. पुण्यातून इच्छुक रमेश आप्पा थोरात यांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतली.

कोकणातील पक्षनिहाय स्थिती

शिवसेना शिंदे गट – 236
भाजप – 151
राष्ट्रवादी – 63
शिवसेना ठाकरे – 55
काँग्रेस – 50