रत्नागिरी:- गतवर्षीसुद्धा गणेशोत्सवासाठी रेल्वेने जादा गाड्या सोडल्या होत्या. त्याप्रमाणेच लागतील तेवढ्या गाड्या सोडू, अशी ग्वाही रावसाहेब दानवे यांनी दिली. ते म्हणाले की, कोकणातून मालवाहतुकीसाठी जादा गाड्यांची मागणी व्हायला हवी आहे. मालवाहतूक हा रेल्वेचा आत्मा आहे. याकरिता आम्ही प्रस्तावाची वाट पाहतो आहोत. आम्ही प्रवासी वाहतूक करतोच, पण मालवाहतुकीतून उत्पन्न मिळते. भारतात कोळशाची १२०० ते २२०० रूपये टन असा दर आहे. परंतु परदेशातून कोळसा आणायचा झाल्यास हाच दर १० हजार रुपयांपर्यंत जातो. त्यामुळे कोळसा उत्पादन वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोळशाअभावी रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
पत्रकार परिषदेला भाजपा जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन, माजी जिल्हाध्यक्ष बाळ माने, अॅड. बाबा परुळेकर, प्रमोद जठार, राजन तेली, अॅड. विलास पाटणे आदीसह तालुका व शहराचे पदाधिकारी उपस्थित होते.
कोळसा संकट आणि याआधीचे कोरोना संकट यामुळे अनेक सवलती बंद केल्या आहेत. त्यांचा आढावा घेऊन आता त्या हळुहळू सुरू करण्याचा विचार आहे. कोरोना महामारीमुळे खासदार, मंत्री यांचे फंड बंद केले, देश महामारीच्या संकटात असल्याने सवलती बंद केल्या होत्या. परंतु आता जनजीवन पूर्वपदावर येत असल्याने याबाबत निर्णय घेऊ, अशी ग्वाही मंत्री दानवे यांनी दिली.
कोकण रेल्वेचे दुपदरीकरण जेवढे शक्य आहे तेवढे करण्यात येत आहे. जिथे बोगदे आहेत तिथे थोड्या अडचणी असल्याने याबाबत पुढचा विचार करण्यात येईल, असे दानवे यांनी स्पष्ट सांगितले. पर्यटन वाढीसाठी डेक्कन ओडिसी चालू व्हावी, अशी सूचना पत्रकारांनी केली. दिवापर्यंत जाणारी पॅसेंजर ट्रेन दादरपर्यंत विस्तारित करावी, ऑनलाइन बुकिंग सुरू करण्याची सूचनाही यावेळी केली.
पेट्रोल, डिझेलचे दर आंतरराष्ट्रीय बाजारावर ठरतात. ते आता दिवसातून दोन वेळाही वाढत आहेत. त्यावर उपाय म्हणून केंद्र सरकारने दोन वेळा करकपात केली. भाजपाशासित राज्य सरकारनेही करकपात केली. परंतु महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारने कर कमी केला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेची काळजी म्हणूनच कर कपात केल्याचे श्री. दानवे म्हणाले.









