रत्नागिरी:- कुवारबाव परिसरात आज सकाळी १०:४५ वाजण्याच्या सुमारास तीन डंपरचा अपघात घडला. एमआयडीसी रस्त्याकडे जाण्यासाठी थांबलेल्या डंपरला मागून येणाऱ्या ब्रेक फेल झालेल्या डंपरने धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसून मोठी दुर्घटना टळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुवारबाव येथे डंपर (MH 08 DD 7794) हा एमआयडीसीच्या रोडकडे जाण्यासाठी थांबला होता. याच वेळी मागून येणारा डंपर (MH 08 AP 2637), ज्याचा चालक अमीन रेड्डी हा होता, त्याच्या गाडीचे अचानक ब्रेक न लागल्याने हा डंपर थेट पुढे थांबलेल्या डंपरवर जाऊन आदळला. धडकेनंतर अमीन रेड्डी यांचा डंपर रिव्हर्स मागे येत असताना, पाठीमागून येणाऱ्या तिसऱ्या डंपरला (MH 08 W 2900) देखील त्याची जोरदार धडक बसली. या विचित्र अपघातात तिन्ही डंपरचे नुकसान झाले आहे. मात्र, अपघाताच्या वेळी कोणालाही दुखापत झाली नसल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. घटनेनंतर स्थानिक परिसरात काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती.









