Tuesday, June 16, 2026
spot_img
Home रत्नागिरी कुवारबाव उड्डाण पुलासाठी माती परिक्षणाचे काम सुरू

कुवारबाव उड्डाण पुलासाठी माती परिक्षणाचे काम सुरू

रत्नागिरी:- मिऱ्या-नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. यामध्ये कुवारबाव बाजारपेठ वाचविण्यासाठी व्यापारी संघटनेने अनेक प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना मंत्री उदय सामंत यांच्या मध्यस्ती आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारामुळे यश आल्याने तिथे १६ पिलरचे सुमारे शंभर कोटीचे मोठे उड्डाण फुल निश्चित झाले आहे. त्याचे काम देखील सुरू झाले असून पुलाची उभारणी करण्यासाठी अत्याधुनिक यंत्राद्वारे माती परिक्षणाचे काम सुरू झाले आहे.

मिऱ्या-नागपूर महामार्गामध्ये कुवाबाव बाजारपेठेचे काय होणार हा एकच प्रश्न होता. मात्र कुवारबावच्या व्यापारी संघटनेने नियोजनबद्ध पावले टाकली. त्याला मंत्री उदय सामंत यांची साथ लागील आणि कोल्हापूर विमानतळावर केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत व्यापारी संघटनेची बैठक लावली. या बैठकीमध्ये अनेक मुद्द्यावर चर्चा झाली. या चौपदरीरणामध्ये कुवारबाव बाजारपेठ उद्ध्वस्त होणार होती. यामध्ये तीनशे व्यापारी उद्ध्वस्त होणार होते. त्यामुळे याला प्रचंड विरोध झाला. अनेक वेळा मोजणी प्रक्रिया व्यापाऱ्यांनी हाणून पाडली. तसेच रस्ता समान पातळीला आणण्यासाठी सुमारे चार मीटर भर टाकावी लागणार होती. भरावामुळे बाजारपेठ खाली जाऊन त्याचे महत्त्व राहणार नव्हते, सर्व्हिस रोडचा प्रश्न होता, अशा अनेक गोष्टींवर चर्चा झाली. अखेर केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी येथे उड्डाण पुल बांधण्याचा निर्णय घेतला. कुवारबावची बाजारपेठ राखण्यासाठी, सामंत आणि संघटनेच्या आग्रहाखातर त्यांनी पाटबंधारे विभागापासून ते रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यापर्यंत उड्डाणपुल निश्चित केले. १०१ कोटीचा १६ पिलरच्या या उड्डाण पुलाचा प्रस्ताव आहे.
या पुलाच्या दोन्ही बाजूला प्रशस्त सुमारे ४५ मीटरचा सर्व्हिस रोड तयार करण्यात आला आहे. दोन्ही बाजूनी हा रस्ता आहे. त्यामुळे ही बाजारपेठ वाचली आहे. आता पुलाच्या कामाला वेग आला आहे. सर्व्हिस रोडचे काम पुर्ण झाल्यामुळे ठेकेदाराने १६ पिलरच्या पुलाच्या कामाला सुरवात केली आहे. त्याअनुषंगाने सध्या अधुनिक यंत्राद्वारे माती परिक्षण सुरू आहे.