सीआरझेड, वन विभागाच्या परवानगी घेण्याच्या हालचाली
रत्नागिरी:- रेवस-रेड्डी सागरी महामार्ग काळबादेवी गावातून पूढे नेण्यात येणार होता. त्याला ग्रामस्थांनी आक्षेप घेतला होता. तसेच हा मार्ग किनाऱ्यावरील नव्या ध्रुतप्रतिबंधक बंधा-यावरून न्या अशीही सूचना केली होती. त्यामुळे एमएसआरडीसीने काळबादेवी किनाऱ्यावरून थेट आरे-वारेला जोडण्याचा विचार आहे. नवीन मार्ग सीआरझेड आणि वन विभागाच्या जागेतून जाणार असल्यामुळे त्यांची परवानगी घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) हालचाली सुरू केल्या आहेत.
रेवस-रेड्डी सागरी महामार्गावरील काळबादेवी येथील खाडीवरील पुलाचे बांधकाम मंजूर झाले असून त्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत निविदा अंतीम करण्यात येत आहे. काळबादेवी व परिसरातील सागरी महामार्गाच्या आखणीबाबत सविस्तर सादरीकरण काळबादेवी ग्रामस्थांना देण्यात आले होते. महामंडळाने प्रस्तावित केलेल्या आखणीबाबत काळबादेवी ग्रामस्थ सहमत नसल्यामुळे त्यांनी किनाऱ्यावर अस्तित्वात असलेल्या ध्रुतप्रतिबंधक बंधा-याच्या जवळून पुलाची आखणी करावी अशी सूचना केली होती. त्याअनुषंगाने महामंडळामार्फत सुधारित आखणी तयार करून आखणी नकाशा ग्रामपंचायत कार्यालयाला सादर केला. काळबादेवी ग्रामस्थांनी प्रस्तावित केलेली आखणी ही सीआरझेड १ ए या झोन मधून आणि वन विभागाच्या जागेतून जात आहे. या परवानगीसाठी सीआरझेड आणि वन विभागाकडे प्रस्ताव सादर करताना पर्यायी आखणीबाबत सविस्तर अहवाल (Alternate Alignment Study Report) सादर करणे आवश्यक असल्यामुळे प्रस्तावित आखणीचे सविस्तर सर्व्हेक्षण करून तसा प्रस्ताव तयार करावा लागणार आहे. त्यासाठी तिन्ही आखणीच्या सर्व्हेक्षणासाठी काळबादेवी ग्रामपंचायतीकडे महामंडळाने परवानगी मागितली आहे. तसे झाल्यानंतर पुढील प्रक्रिया केली जाणार आहे. तीन वेगवेगळ्या आखण्यांबाबत सर्व्हेक्षण करण्यासाठी परवानगी द्यावी, असे पत्र एमएसआरडीसीने ग्रामपंचायतीला दिले आहे. त्याला अद्यापही ग्रापंचायतीकडून प्रतिसाद मिळालेला नाही.
धुपप्रतिबंधक किनाऱ्यावरून महामार्ग नेण्यासाठी ग्रामस्थांची मागणी आहे. त्यामुळे एमएसआरडीसीने तेवढ्याच भागाची आखणी करावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे. उर्वरीत दोन मार्गाच्या आखणीची आवश्यकता नाही.- संदेश बनप, ग्रामस्थ, काळबादेवी