करबुडे येथे आंबा बागेला लागलेल्या वणव्यामुळे 6 लाखांचे नुकसान

रत्नागिरी:- तालुक्यातील करबुडे परिसरात प्रशांत प्रभाकर सावंत यांच्या आंबा कलमांच्या बागेला बुधवारी दुपारी वणवा लागला. त्या वणव्यात बागेतील सुमारे 100 ते 125 कलम होरपळून सुमारे 6 लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

बुधवारी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास रणरणत्या उन्हात सावंत यांच्या बागेत वणवा लागला. करबुडे शेटीचे खळे येथील सर्वे न. 1 हिस्सा न.2 मधील कलम बागेला ही आग लागली होती. त्यात आंबा कलमे मोठ्या प्रमाणात होरपळून गेली. अनेक झाडांना मोहोर तर फळधारणा झालेली होती. पण त्या वणव्याच्या आगीत सारे भस्मसात झाले.