ऑनलाईन नोंदी न झाल्याने अनेकजण धान्य वाटपाच्या लाभापासून वंचित

रत्नागिरी:- तालुक्यातील पुरवठा विभागातील आवक-जावक नोंद, नवीन रेशकार्ड व रेशनकार्डवरील नावे ऑनलाईन होण्यासाठी अर्ज देऊनही ते प्रस्ताव पडून आहेत. त्यामुळे पुरवठा विभागाकडून होणार्‍या धान्यवाटपाच्या लाभापासून महिनोंमहिने कार्डधारकांना वंचित रहावले लागत आहे. यावर तोडगा काढा अशी मागणी जिल्हा परिषद माजी समाजकल्याण सभापती परशुराम कदम यांनी तहसिलदारांकडे केली.

पुरवठा विभागाशी निगडीत विविध मागण्यांचे निवेदन कदम यांनी तहसिलदार राजाराम म्हात्रे यांना दिले आहे. नवीन रेशनकार्डसाठीही 10 महिने जात आहेत. तसेच पी. एम. किसान सन्मान योजनेसंदर्भातील अर्जही पडून आहेत. त्याबाबतची ऑनलाईनची कामे ही ठप्प आहेत. या सर्व कामांसाठी लोकांच्या वारंवार फेर्‍या होत असून संबंधित कार्यालयात सारखे फेरफटके मारुनही त्यांची गैरसोय होत आहे. कामे होत नसल्यामुळे कार्डधारकांना मानसिक त्रास होतो. टपालात अर्ज दिल्यापासून ’वेळोवेळी चौकशीला गेले असता तेथील कर्मचार्‍यांकडून टपालातून अर्ज आमचेपर्यंत पोहोच झाला नाही असे सांगण्यात येत. संबंधित विभागाचे कर्मचारी कामात टाळाटाळ करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कामांना विलंब होतो. तसेच सर्वसामान्यांच्या प्रवासाला होणारा खर्चही फेर्‍या मारुन वाया जात आहे. संबंधित कार्यालयातील कर्मचारी हे तारखेवर तारीख देऊनही ती कामे पूर्ण होत नाहीत. याबाबत संबंधित कर्मचार्‍यांची चौकशी करावीत. रेशनकार्ड विभक्तीकरण आणि पुरवठा विभागातील रेशनकार्डवरील नवीन नावे नोंदवणे त्याचप्रमाणे धान्य पुरवठा यादीत नव्याने समाविष्ठ होणार्‍या रेशनकार्ड धारकांना रेशनधान्य चालु करताना ती नवीन नावे ऑनलाइन केल्याशिवाय गावातील रेशनदुकानावर धान्य मिळत नाही. या प्रकियेत तालुक्यातील ग्रामस्थांना होत असलेल्या अडचणीसंदर्भात माजी समाजकल्याण सभापती परशुराम मारुती कदम यांनी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी पानवल, हातखंबा, पाली या गावातील ग्रामस्थांची रखडलेली कामे तात्काळ करण्याचे आदेश तहसीलदार म्हात्रे यांनी संबंधित अधिकार्‍यांना बोलवून सोमवारी पूर्ण करून द्या, अशा सूचना दिल्या.