रत्नागिरी:- ऑक्टोबर हिटचा सर्वाधिक फटका रत्नागिरी शहर आणि परिसरातील नागरिकांना बसला. गणेशोत्सवानंतर रत्नागिरीत ‘ऑक्टोबर हिट’चा प्रभाव अधिक तीव्रतेने जाणवला. गेल्या तीन दिवसांपासून कमाल तापमान ३५ ते ३८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहिल्याने शहरवासीयांना उन्हाच्या तीव्र झळा आणि उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागला. मात्र, रविवारी (ता. ४) सायंकाळी अचानक वारे वाहू लागल्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आणि रत्नागिरीकरांना दिलासा मिळाला.
ऑक्टोबर २०२६ च्या सुरुवातीलाच राज्यातून नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) वेगाने मागे फिरण्यास सुरुवात झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णै बंदरामधून मॉन्सून अधिकृतपणे परतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. यामुळे अनेक भागांतून पावसाचा प्रवास आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या मॉन्सूनच्या परतीच्या मुख्य रेषेची स्थिती स्पष्ट झाली असून ही रेषा कोकणातील हर्णै, मध्य महाराष्ट्रातील बारामती, मराठवाड्यातील परभणी आणि विदर्भातील ब्रह्मपुरी या भागांतून जात आहे. परंतु, दरवर्षीप्रमाणे यंदा मॉन्सूनच्या परतीचा पाऊस रत्नागिरी जिल्ह्यात नोंदलाच गेला नाही. त्यामुळे शेवटच्या टप्यातील पावसाची अजून प्रतीक्षाच आहे.
ऋतु बदलाचे परिणाम रत्नागिरीत जाणवू लागलेले आहेत. हवामाना विभागाच्या आकडेवारीनुसार, २ ऑक्टोबर रोजी रत्नागिरीत कमाल तापमान थेट ३८.० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते, तर किमान तापमान २५.५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. ३ ऑक्टोबर रोजीही उन्हाची तीव्रता कायम राहत कमाल ३७.७ अंश सेल्सिअस आणि किमान २६.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. सलग दोन दिवस ३८ अंशाच्या आसपास गेलेल्या पाऱ्यामुळे दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट होता. मात्र रविवारी कमाल तापमानात २ अंशाने घट झाली. आज ३५.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले, तर किमान तापमान २४.८ अंश सेल्सिअसवर आले आहे. मात्र दिवसभरातील कडक ऊन आणि सोबतीला असणारा उकाडा यामुळे नागरिक त्रस्तच होते. परंतु, सायंकाळी हवामानात बदल होऊन मंद वारे वाहू लागले. त्यामुळे वातावरणात गारवा होता.









