Thursday, September 17, 2026
spot_img
Home रत्नागिरी ऐन गणेशोत्सवात परतीच्या पावसाचा जिल्हाभरात धुमाकुळ

ऐन गणेशोत्सवात परतीच्या पावसाचा जिल्हाभरात धुमाकुळ

रत्नागिरी:- रत्नागिरीत बुधवारी दुपारनंतर अचानक परतीचा पाऊस दाखल झाला. विजांच्या लखलखाटात आणि ढगांच्या गडगडाटात मुसळधार पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांसह बाजारपेठेतील व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान केले. जवळपास एक तासापेक्षा अधिक काळ मुसळधार पावसाच्या सरींनी जिल्ह्याच्या अनेक भागात हजेरी लावली होती.

जिल्हाभरात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला आहे. मंगळवारीच दीजिल्हाभरातड दिवसांच्या बाप्पांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. आता गौरीच्या आगमनासाठी भाविक सज्ज झाले आहेत. गौरीच्या आगमनाची तयारी पूर्ण करण्यासाठी बाजारपेठेत गर्दी वाढू लागली असतानाच अचानक पावसाने हजेरी लावल्याने व्यापाऱ्यांची पंचाईत झाली आहे. अचानक आलेल्या परतीच्या पावसाने बळीराजासह व्यापाऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. बुधवारी अचानक सुरू झालेल्या परतीच्या मुसळधार पावसाने बाजारपेठेतील व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. गौरी सणासाठी रत्नागिरी बाजारपेठ आकर्षकपणे सजली होती. व्यापाऱ्यांनी आवश्यक वस्तू आकर्षकपणे बाजारपेठेत मांडल्या होत्या. मात्र अचानक अवघ्या काही सेकंदात आलेल्या मुसळधार पावसाने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे.
बुधवारी सायंकाळी अचानक परतीच्या पावसाने हजेरी लावली. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आकाशात काळे ढग दाटून आले. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील काही दिवस पावसाचा जोर राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र ऐन गणेशोत्सवाच्या धामधुमीत परतीच्या पावसाने आपला जोर वाढवल्याने मोठी पंचाईत झाली असून याचा मोठा फटका बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना बसला आहे. अचानक आलेल्या पावसाने खरेदीवर परिणाम झाला असून पावसाचा जोर कायम राहिल्यास व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.