एसटी संपात फूट; कनिष्ठ वेतन श्रेणी संघटनेकडून संप मागे

मुंबई:- राज्यात मागील 54 दिवसांपासून सुरु असलेल्या एसटी कर्मचारी आंदोलनात आता फूट पडल्याचं पाहायला मिळत आहे. कनिष्ठ वेतन श्रेणी संघटनेकडून एसटी संप मागे घेण्याची घोषणा केली आहे. संपकरी नेते अजय गुजर यांनी याबाबतची नुकतीच घोषणा केली आहे. सर्व कर्मचाऱ्यांनी आपापल्या कामावर रूजू व्हावं असे त्यांनी सांगीतले. पण अनेक संघटनांना हा निर्णय मान्य नसल्याचे सांगून संप सुरूच ठेवणार असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.

अखेर कर्मचाऱ्यांचे निलंबन, बदली, त्यांच्यावरील फौजदारी कारवाई मागे घेणे अशा विविध मुद्यांवर काही अटी व शर्तींच्या आधीन राहून हा संप मागे घेत असल्याची माहिती अजय गुजर यांनी दिली. मात्र इतर एसटी संघटनांकडून संपाबाबत आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे अजय गुजर प्रणित संघटनेने संपातून माघार घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच गुजर यांनी त्यांच्या संघटनेतील कर्मचा-यांना २२ डिसेंबर पर्यंत कामावर हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अजय गुजर यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले, एसटी कर्मचाऱ्यांनी कोणताही अनुचित प्रकार संपादरम्यान केला नाही. विलीनीकरणाच्या मुद्यावर बोलताना समितीचा जो काही निर्णय येईल तो राज्य शासन आणि एसटी कर्मचाऱ्यांना मान्य असणार आहे. मात्र एसटीच्या विलीनीकरणावर आम्ही आजही ठाम आहोत. संपादरम्यान मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना योग्य तो मोबदला दिला जाईल. त्याचबरोबर कोरोना काळात मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना नियमानुसार मोबदला देण्यात येणार आहे. तसेच राज्य शासनाने वेतनवाढीवर विचार करण्याचे देखील आश्वासन दिले आहे. राज्यातील परिस्थिती जाणिव ठेवून आम्ही संप मागे घेत आहोत. राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्यात येणार असल्याचे देखील राज्य शासनाने मान्य केले आहे.