एसटी- दुचाकी अपघातात स्वार गंभीर जखमी

खेड-दापोली मार्गावर वाकवली येथील घटना

दापोली:- खेड-दापोली मार्गावर वाकवली शिरशिंगे फाट्याजवळ कोल्हापूर-दापोली एसटी बसने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून, एसटी चालकाविरुद्ध दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २५ मार्च रोजी रात्री ११:३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी लक्ष्मण विठ्ठल नाटेकर (वय ४८) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, कोल्हापूरहून दापोलीच्या दिशेने येणारी एसटी बस (क्रमांक: MH 20 BL 1676) अत्यंत वेगात होती. बस चालक स्वप्नील बाळकृष्ण माने (रा. एसटी डेपो, दापोली) याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून बस चुकीच्या बाजूने चालवली. यावेळी समोरून येणाऱ्या गणेश नंदकुमार सातनाक (वय ४२, रा. वाकवली) यांच्या दुचाकीला (क्रमांक: MH 08 F 5350) एसटीने जोरदार धडक दिली.

या भीषण धडकेत दुचाकीस्वार गणेश सातनाक यांच्या नाकाला आणि तोंडाला गंभीर दुखापत झाली आहे. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. जखमीला तातडीने उपचारासाठी हलवण्यात आले आहे. याप्रकरणी दापोली पोलिसांनी बस चालक स्वप्नील माने याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८१, १२५ (अ) आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या अपघाताचा अधिक तपास पोलीस करत आहेत.