एसटीतील 185 कर्मचारी बडतर्फ तर 237 जणांवर सेवासमाप्तीची कारवाई 

रत्नागिरी:- रत्नागिरी एसटी विभागात आतापर्यंत १८५ कर्मचारी बडतर्फ करण्यात आले असून, २३७ जणांवर सेवासमाप्तीची कारवाई करण्यात आली आहे. एकूण ३४९९ कर्मचाऱ्यांपैकी २६५५ कर्मचारी संपामध्ये सक्रिय आहेत. आज जिल्ह्यात ६५६ कर्मचारी उपस्थित होते. १० जण गैरहजर होते आणि १७८ जण अधिकृत रजा, दौरा, साप्ताहिक सुट्टीवर होते.

जिल्ह्यात १११६ चालक तथा वाहकांपैकी फक्त ६५, चालक ७७४ पैकी ८६ आणि वाहक ६१४ पैकी ७० हजर आहेत. त्यामुळे थोड्या प्रमाणातच वाहतूक सुरू आहे. दररोज दोन लाख प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या रत्नागिरी एसटी विभागात आज फक्त ३० ते ३५ हजार प्रवाशांची वाहतूक केली जात आहे. त्यामुळे उत्पन्न १० लाख रुपयांच्या आतच आहे. दैनंदिन १५ लाख रुपयांचे नुकसान एसटीला सहन करावे लागत आहे. गेल्या सुमारे ८४ दिवसांत कोट्यवधी रुपयांचे नुकसान एसटीला सहन करावे लागले आहे.

महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावे, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन चालू केले. यावर निर्णय घेण्यासाठी उच्च न्यायालयाने मुख्य सचिवांसह त्रिसदस्यीय समिती स्थापन केली. या समितीला दिलेली १२ आठवड्यांची मुदत काल (ता. ३) संपली आहे. या अहवालावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपला अभिप्राय देण्याच्या सूचना न्यायालयाच्या आहेत. या दरम्यान राज्यात ८० कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली. विलिनीकरण होणारच, असा विश्वास कर्मचाऱ्यांना असल्यामुळे कोणीही कर्मचारी कामावर हजर व्हायला तयार नाहीत.

उत्पन्न १० लाखांवर
रत्नागिरी एसटी विभागाने काल (ता. ३) ३२ हजार ७६३ प्रवाशांची वाहतूक करून १० लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले. यामध्ये मंडणगड आगाराला १५ हजार, दापोली २ लाख, खेड ९७ हजार, चिपळूण १ लाख ८५ हजार, गुहागर १८ हजार, देवरूख २ लाख ३३ हजार, रत्नागिरी ७३ हजार, लांजा २४ हजार, राजापूर १ लाख ४८ हजार रुपये उत्पन्न मिळाले आहे. मंडणगड, लांजा आणि गुहागर या तीन बसस्थानकातून वाहतूक अत्यल्प स्वरूपात सुरू आहे.