‘एसटी’चे विलीनीकरण झालेच पाहिजे: सोमय्या

रत्नागिरी:- आझाद मैदान, ठाणे, कल्याण, औरंगाबाद आदी सर्व ठिकाणी मी कामगारांना भेटलो. कामगार रस्त्यावर उतरले आहेत. झोपतात पण तिथेच. परवा तेरावा दिवस होता म्हणजे आंदोलनाचा. कधीतरी या सरकारचे तेरावे करावे लागणार आहे. एसटी कामगार घरी जात नाही. साम, दाम, दंड, भेद करूनही एसटी कामगार मागे हटणार नाही. तुमच्या या लढ्यात पूर्ण महाराष्ट्र सोबत आहे. नक्की न्याय मिळणार आहे, एस टी शासनात विलीनीकरण झालेच पाहिजे असे सांगत भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी येथे एसटी कामगारांना पाठबळ दिले.  

परिवहनमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब, शरद पवार आणि ठाकरेंनी एसटीची वाट लावली. चार तास चर्चा करत होते की पत्ते खेळत होते. कर्मचारी निलंबित केले, कर्मचारी हजर झाले, पहिली एसटी सुटली अशा बातम्या देत होते. परब फक्त टाईमपास करत आहेत. हा संप म्हणजे क्रांती आहे. एसटी कामगारांच्या जीवाशी खेळणाऱ्या या आघाडी सरकारला सोडणार नाही. दादागिरी व वसुलीचे धंदे करणाऱ्या तिघाडी सरकारला घरी बसवू. या सरकारचे तेरावे घालू, पण अजून काही दिवस आहेत, 

माळनाका येथे एसटी विभागीय कार्यालयाच्या बाहेर काम बंद आंदोलन एसटी कर्मचारी करत आहेत. आज सोमय्या रत्नागिरी दौऱ्यावर आले असता दुपारी कामगारांमध्ये सामील होत भाषण दिले. त्या वेळी ते बोलत होते. शासनात विलीनीकरण झालेच पाहिजे आणि कामगारांवर अन्याय करू नका, असेही सोमय्या यांनी सांगितले.

या वेळी सोमय्या म्हणाले की, गेले पंधरा दिवस कामगार आंदोलन करत आहेत. दुसऱ्या बाजूला राज्य सरकार दोन हजार कर्मचाऱ्यांना काढले, नवीन भरती केली, पहिली एसटी बस सुटली असे खोटे सांगत आहे. कामगारांच्या जीवाशी खेळतात त्यांना सोडणार नाही. महामंडळाने कामगार युनियनशी करार केले. एवढे टक्के वाढले म्हणून मिठाई वाटली. मग का एसटी चालत नाही. संप सुटला, कामगार कामावर आले असे परब खोटे सांगताहेत. कामगारांना न्याय देण्याचे काम करा. मी महाराष्ट्रभर फिरतोय. मागण्या मान्य कराव्याच लागणार कारण दुनिया झुकती झुकानेवाला चाहिये.सोमय्या यांनी पुढे सांगितले.