एनडीआरएफची चार पथके; साडेपाच हजार लोकांच्या स्थलांतराची व्यवस्था 

रत्नागिरी:- जिल्ह्यात 11 ते 12 जूनला अति मुसळधार पावसाची शक्यता असून पुर स्थिती उद्भवल्यास प्रशासन सज्ज झाले आहे. चार एनडीआरएफची पथके दाखल झाली असून साडेपाच हजार लोकांच्या स्थलांतराची व्यवस्था केली आहे. समुद्र, खाडी, नदी किनार्‍यावरील पुरग्रस्त, दरडग्रस्त भागात प्रवासासाठी प्रतिबंध घातले आहेत. 

जिल्ह्यात मागील चोविस तासात सरासरी 21.30 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यात मंडणगड 22, दापोली 31.10, खेड 42.80, गुहागर 12.60, चिपळूण 3.70, संगमेश्वर 19.30, रत्नागिरी 32, राजापूर 13.50, लांजा 14.70 मिमी पाऊस झाला. गुरुवारी (ता. 10) सकाळी संततधार पाऊस झाला; मात्र दुपारनंतर पावसाने विश्रांती घेतली. हवामान विभागाकडून जिल्ह्यात 11 ते 12 जूनसाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे. या कालावधीत अति मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने गेले दोन दिवस आपत्कालासाठी तयारी केली आहे. यासंदर्भात तहसिल प्रशासनाला आदेशही काढले आहेत. त्यानुसार समुद्र, खाडी व नदी किनार्‍यावरील गावांसह चिपळूण, खेड व राजापूर पालिका परिसरात पुराचा धोका निर्माण होऊ शकतो. दरड कोसळण्याचीही शक्यता आहे. जिवित व वित्त हानी टाळण्यासाठी पुरग्रस्त व दरडग्रस्त परिसरात पुढील दोन दिवस जाण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. जिल्ह्यात पुरग्रस्त 31 आणि दरडग्रस्त 45 ठिकाणे आहेत. धोकादायक ठरणार्‍या ठिकाणांवर 5 हजार 500 कुटूंबे असून आवश्यकता भासल्यास त्यांचे स्थलांतर करण्याची तयारी केली आहे.

पुर परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी एनडीआरएफची (राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक) चार पथके जिल्ह्यात दाखल झाली आहेत. त्यातील वीस जणांचे एक पथक रत्नागिरीत आहे. शुक्रवारी (ता. 11) ते पुरग्रस्त भागांची पाहणी करतील. पुर परिस्थितीसाठी अतिसंवेदनशील असलेल्या चिपळूण, खेडसह राजापूरला तिन पथके रवाना झाली आहे. प्रत्येक पथकाकडे तिन फायबर बोटी असून अन्य आवश्यक साहित्य उपलब्ध आहे. रत्नागिरी तालुक्यात सोमेश्‍वर, हरचिरी चांदेराई, टेंभ्ये यासह खाडी किनार्‍यांवरील 56 गावांना सतर्कतेच्या सुचना दिल्या आहेत. सोमेश्‍वर येथे फायबर बोट आणि बोये सज्ज ठेवले आहेत. रत्नागिरीत स्थलांतराची आवश्यकता नाही. काजळी नदी किनार्‍यावरील चांदेराई बाजारपेठेतील 8 दुकानांना स्थलांतराच्या नोटीस देण्यात आल्या आहेत. रत्नागिरी शहरातील झाडगाव किनार्‍यांवरील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सुचना दिल्या आहेत. आमावस्येमुळे किनारी भागात भरतीच्यावेळी अजस्त्र लाटांचे तांडव पहायला मिळत आहे.