रत्नागिरी:- एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन 2022-23 साठी रत्नागिरी जिल्ह्याला रक्कम रूपये 229.22 लाखांचा कार्यक्रम मंजूर करण्यात आला आहे. यामध्येे विविध बाबींचा समावेश आहे.
उच्च तंत्रज्ञानावर आधारित रोपवाटीका, क्षेत्रविस्तार, फळपिके, फुलांचे उत्पादन, मसाला पिके, अळिंबी उत्पादन, जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवन, सामूहिक शेततळे, शेततळे अस्तरीकरण, नियंत्रित शेती, फलोत्पादन यांत्रिकीकरण, मुनष्यबळ विकास कार्यक्रम/काढणी उत्तर व्यवस्थापन आणि पणन सुविधा इत्यादी विविध बाबींचा समावेश आहे. यामध्ये यावर्षी प्रामुख्याने मधुमक्षिका पालनासाठी तरतूद करण्यात आली आहे.
लागवड साहित्य निर्मितीसाठी उच्च तंत्रज्ञानावर आधारित लहान रोपवाटीकासाठी 7 लाख 50 हजार रुपये, ड्रॅगन फ्रुट व अॅवोकॅडो यासाठी रक्कम 2 लाख 16 हजार रुपये, पुष्पोत्पादनासाठी 16 हजार रुपये, मसाला पिकांच्या लागवडीसाठी 23 लाख रुपये, अळंबी उत्पादन प्रकल्पासाठी 8 लाख रुपये, जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवन-आंबा रक्कम 20 लाख रूपये, सामूहिक शेततळ्यासाठी रक्कम 15 लाख रुपये, शेततळे अस्तरीकरणासाठी रक्कम 5.25 लाख रूपये, नियंत्रित शेती-हरीतगृह, शेडनेटगृह, प्लास्टिक मल्चींगसाठी एकूण रक्कम 10 लाख 40 हजार रूपये, मधुमक्षिका पालनासाठी रक्कम 1 लाख 68 हजार रूपये, फलोत्पादन यांत्रिकीकरणासाठी 54 लाख 83 हजार लाख रूपये एवढी तरतूद आहे.
यामध्ये ट्रॅक्टर, पॉवर टिलर, पिक संरक्षण उपकरणांचा समावेश आहे. शेतकरी प्रशिक्षण शेतकरी प्रक्षेत्र भेट प्रशिक्षण यासाठी 10 लाख 50 हजार रुपये तरतूद आहे. रत्नागिरी जिल्हयाच्या दृष्टीने महत्त्वाची व सर्वाधिक मागणी असलेल्या पॅक हाऊस, रेफर व्हॅन, रायपनिंग चेंबर, प्राथमिक प्रक्रिया केंद्र इत्यादी घटकांसाठी 70 लाख 10 हजार इतकी भरीव तरतूद करण्यात आली आहे. फिरते विक्री केंद्रासाठी 60 हजार रूपये लाख अशी एकूण रक्कम रूपये 229.22 लाख तरतुद रत्नागिरी जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेली आहे.
या योजनेमधे सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील शेतकर्यांनी महाडीबीटी आज्ञावलीवर अर्ज करणे आवश्यक आहे. यासाठी आपल्या नजिकच्या आपले सरकार ई-सेवा केंद्रामधे जाऊन किंवा देखील अर्ज करता येऊ शकेल. जिल्ह्यातील जास्तीतजास्त शेतकर्यांनी फलोत्पादनाशी निगडीत योजनांचा लाभ घ्यावा. योजनेच्या अधिक माहितीसाठी गावपातळीवरील कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक तसेच मंडल कृषी अधिकारी अथवा तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी किंवा जिल्हा स्तरावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रत्नागिरी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रत्नागिरी यांनी केले आहे.