एअरलिफ्टींगच्या माध्यमातून पुरात फसलेल्याना बाहेर काढणार: पालकमंत्री 

रत्नागिरी:- कोकणावर निसर्गाचे सतत संकट कोसळले आहे. यावेळी अतिवृष्टीमुळे संकट निर्माण झाले आहे. चिपळुणची परिस्थिती भयानक असून येथील पुरात अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी एअरलिफ्टींग करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती पालकमंत्री ॲड. अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत दिली.

बुधवारी रात्रीपासून जिल्ह्यात मुसळधार पावसाने अक्षरश: धुडगूस घातला. सह्याद्रीच्या पट्‌ट्यात धो-धो कोसळल्याने धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली. तर अनेक नद्यांना पूर आले. जिल्ह्यात सर्वच ठिकाणी प्रलयाचे चित्र पहायला मिळत होते.
गुरुवारी रत्नागिरीचे पालकमंत्री ॲड. अनिल परब जिल्हा दौर्‍यावर आले होाते. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील पूरपरिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, कोळकेवाडी येथून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. धरणाचे तीन दरवाजे उघडल्याने कोळकेवाडीतून चिपळूण शहरात पाण्याचा विसर्ग अतिवेगाने होऊ लागला. सध्या चिपळुणातील वाशिष्ठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असल्याची माहिती पालकमंत्री अनिल परब यांनी दिली.

चिपळूण तालुक्यात महाप्रलय आल्यानंतर येथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी खासगी चार नौका, कोस्ट गार्डची १, कस्टमची १ व नगरपरिषदेच्या २ नौका मदतकार्यासाठी पाठविण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. तसेच एनडीआरएफच्या दोन पथकांना पाचारण करण्यात आले असून २३ जणांच्या २ तुकड्या जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. त्यातील १ तुकडी चिपळूण तालुक्यात व १ टीम खेड तालुक्यात पाठविली असल्याचे ना. परब यांनी सांगितले.

हे पुन्हा एकदा आस्मानी संकट कोसळलं आहे. आपत्तीमध्ये सापडलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यावर भर दिला असून स्थलांतरीत केलेल्यांना जेवण व त्यांच्या राहण्याची व्यवस्था प्रशासनामार्फत केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. याबाबत मंत्रालयातदेखील संपर्क साधला असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले की, वेळ पडल्यास हेलिकॉप्टरची मदत घेतली जाईल. यासाठी सकाळपासूनच रेस्क्यू ऑपरशेन सुरू झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
चिपळूण व खेड तालुक्यातील सर्व शैक्षणिक संस्थांच्या इमारती या प्रशासनाने ताब्यात घेतल्या आहेत. याठिकाणी स्थलांतरीत केलेल्या नागरिकांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच हा धोका अद्याप टळलेला नसल्याचे सांगून कोस्ट गार्डलाही घटनास्थळी पाचारण केल्याची माहिती ना. परब यांनी यावेळी दिली.