उमेद अंतर्गत 134 महिलांना 1 कोटी 37 लाखांचा निधी 

रत्नागिरी:- उमेद अभियानातील महिला बचत गटांमार्फत अन्न प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनेतून जिल्ह्यातील 134 महीला लाभार्थ्यांना 1 कोटी 37 लाखाचा निधी मंजूर झाला आहे. राज्याच्या तुलनेत सर्वाधिक अनुदान रत्नागिरी जिल्ह्याला प्राप्त झाला आहे.

कोरोना कालावधीत अनेक उद्योगांची वाताहात झाली. काही उद्योगांना आर्थिक उभारी मिळवून देण्यासाठी केंद्र शासनाने आत्मनिर्भर भारत पॅकेज जाहीर केले. गावागावात अनेक महिला बचत गटांच्या माध्यमातून छोटे छोटे अन्न प्रक्रिया उद्योग केले जातात. त्यावर कुटूंबाची गुजराण होते. यामध्ये पापड-लोणची तयार करणे, गरे तळणे, आंबा व काजू प्रक्रिया उद्योगांचा समावेश आहे. त्यांना उभारी देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाचा सहभाग असलेल्या प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनेतून 2020-21 ते 24-25 या पाच वर्षाच्या कालावधीत राबविण्याचे नियोजन केले आहे. ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील स्वयं सहाय्यता समुहातील एका सदस्याला 40 हजार रुपये बीज भांडवल देण्यात येणार आहे. गटातील दहा सदस्यांना मिळून चार लाख रुपये मिळतील. या योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी उमेद अभियांनातर्गत आवाहन केले होते. जास्तीत जास्त गटातील महिलांनी याचा लाभ घ्यावा यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एन. बी. घाणेकर यांनी नियोजन केले होते. प्रभाग संघात कार्यरत उमेदच्या अधिकार्‍यांनीही ही योजना महिलांपर्यंत पोचवली. त्यामुळे चारशे महिलांनी ऑनलाईन नोंदणी केली होती. राज्याला पहिल्या टप्प्यात 9 कोटी 48 लाख रुपये मंजूर झाले असून रत्नागिरी जिल्हयाला 1 कोटी 37 लाख निधी मिळणार आहे. याचे वितरण 134 लाभार्थ्यांना मिळणार आहे.