रत्नागिरी:- लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा उद्या दि.19 एप्रिल हा शेवटचा दिवस असतानाही महाविकास आघाडीचा प्रतिस्पर्धी असलेल्या महायुतीचा उमेदवार अद्यापपर्यंत जाहीर झालेला नाही. अखेरच्या दिवसापर्यंत प्रतिस्पर्धी पक्षाचा उमेदवार जाहीर न होण्याची ही पहिलीच वेळ आहे. अखेरच्या क्षणीही शिवसेना-भाजप आपलाच उमेदवार असेल असा दावा करीत असल्यामुळे उमेदवारी नक्की केव्हा जाहीर व कोणाला मिळणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. परंतु नेत्यांच्या गुप्त राजकारणामुळे कार्यकर्ते प्रचंड अस्वस्थ झाले आहेत.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरूद्ध महायुती असा थेट सामना रंगणार आहे. महाविकास आघाडीमार्फत शिवसेनेचे विद्यमान खासदार विनायक राऊत यांना उमेदवारी देण्यात आली असून त्यांनी मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर प्रतिस्पर्धी महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा अखेरच्या क्षणीही कायम आहे. शिवसेनेमार्फत पालकमंत्री ना.उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत इच्छुक असून ते मुंबई, गोवा, नागपूर येथे भाजपा नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. गेले 15 दिवस किरण सामंत भेटीगाठीचा कार्यक्रम सुरू असतानाही श्री.सामंत यांना उमेदवारी देण्याचा भाजपा नेत्यांचा ‘मूड’ नसल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय मंत्री ना.नारायण राणे यांनी प्रचाराचा धडाका सुरू केला आहे. आपला अडीच लाखांच्या मताधिक्क्याने विजय होईल असा दावा ना.राणे यांनी जाहीर सभेत केल्यामुळे ना.राणे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.
भाजपने प्रचारात सुरूवात केली असली तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी रत्नागिरीत शांत राहणे पसंत केले आहे. दुसऱ्या बाजुला श्री.सामंत अद्यापही उमेदवारी या आशेवर कायम आहेत. भाजपने दिलेले प्रस्ताव ना.सामंत यांच्यासह किरण सामंत यांना मंजूर झाले नसल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा धनुष्यबाणच चालू शकतो यावर श्री.सामंत ठाम आहेत. या वादात महायुतीची उमेदवारी अडकली आहे. परंतु उद्या दि.19 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज करण्याची अखेरची मुदत असल्याने आज सायंकाळी किंवा उद्या सकाळी महायुतीला आपला उमेदवार जाहीर करावा लागणार आहे.