उन्हाळी हंगामासाठी ‘कोरे’ मार्गावर जादा रेल्वे गाडी

रत्नागिरी:- कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी असून यंदा उन्हाळी हंगामातील प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेच्या समन्वयाने विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मडगाव जंक्शन ते लोकमान्य टिळक (एलटीटी) आणि मडगाव जंक्शन अशी साप्ताहिक विशेष रेल्वे धावणार आहे.

यापुर्वी जाहीर केलेल्या गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाल्याने ही जादा रेल्वे सोडली आहे. कोकण रेल्वे मार्गावर गाडी क्रमांक ०११०४ मडगाव जंक्शन ते लोकमान्य टिळक (एलटीटी) साप्ताहिक विशेष ६ एप्रिल ते ४ मे पर्यंत दर रविवारी सायंकाळी ४.३० वाजता मडगाव जंक्शन येथून सुटेल. गाडी क्रमांक ०११०३ लोकमान्य टिळक (एलटीटी) ते मडगाव जंक्शन मार्गावर साप्ताहिक विशेषांक लोकमान्य टिळक (एलटीटी) येथून ७ एप्रिल ते ५ मे पर्यंत दर सोमवारी सकाळी ८.२० वाजता सुटेल. ही गाडी करमाळी, थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापुरा रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण, पनवेल आणि ठाणे स्थानकावर थांबेल. या गाडीचे आरक्षण २ एप्रिलपासून रेल्वेच्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे, असे कोकण रेल्वेच्या प्रसिद्धी पत्रकात नमुद आहे.