उक्षी सरपंचांना अपात्र न करताच बसवला प्रशासक

सात पैकी सहा सदस्यांनी दिले होते वैयक्तिक कारणास्तव राजिनामे

रत्नागिरी:- तालुक्यातील उक्षी ग्रामपंचायतीमधील सातपैकी सहा सदस्यांनी वैयक्तिक कारणाने राजिनामे दिलेले असताना, सरपंच कार्यक्षमपणे कारभार करीत असतानाही ग्रामपंचायत अल्पमतात असल्याचे कारण देत थेट ग्रामपंचायतच विघटीत करण्याचा निर्णय घेत प्रशासक नेमल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

तालुक्यातील उक्षी ग्रामपंचायतीची निवडणूक होऊन दोन वर्ष उलटली असून, या सदस्यांची मुदत 8 ऑगस्ट 2026पर्यंत होती. परंतु तत्पूर्वीच सातपैकी सहा सदस्यांनी फेब्रुवारी व एप्रिलच्या दरम्यान टप्प्याटप्प्याने राजिनामे दिले. त्यानंतर फेब्रुवारी व एप्रिलच्या मासिक सभेमध्ये हे राजिनामे मंजुर करण्यात आले. या सहाही सदस्यांनी वैयक्तिक कारणासाठी राजिनामे दिल्याचे नमूद केले आहे.

त्यानंतरही सरपंच श्रीमती किरण रविंद्र जाधव हा कामकाज पहात होत्या. सातपैकी सहा सदस्यांनी राजिनामे दिल्यामुळे ही ग्रामपंचायत अल्पमतात आली होती. याबाबत जिल्हा परिषदेत सुनावणीही झाली होती. याबाबत जिल्हा परिषदेने कोकण विभागीय आयुक्तांकडे मार्गदर्शनही मागवले होते. त्यावेळी उपआयुक्त मिनल कुटे यांनी मार्गदर्शन करताना सरपंच हे सद्यस्थितीत सदस्य आणि सरपंच या पदावर कार्यरत असताना प्रशासक नेमणूक करण्यास मान्यता देता येत नसल्याचे 17 मेच्या पत्राने नमूद केले होते.
त्यानंतर पुन्हा एकदा राजकीय चक्रे वेगाने फिरुन उपआयुक्त मिनट कुटे यांनी 31 मे रोजी ग्रामपंचायत उक्षी विघटीत करण्यापूर्वी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सरंपचांना म्हणने मांडण्याचे पत्र 26 मे रोजी पाठवले होते. यावेळी श्रीमती किरण जाधव यांनी लेखी पत्र देताना पुढील कार्यकाळ सरपंच म्हणून राहण्यास इच्छुक असून ग्रामपंचायत विघटीत न करता पोटनिवडणूक घ्याव्यात ही विनंती केली होती. परंतु त्यानंतर विभागीय आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी अल्पमतात असलेली ही ग्रामपंचायत चालवण्यास सरपंच सक्षम नसल्याचे मत नोंदवत ग्रामपंचायत विघटीत करण्याचा निर्णय घेतला आणि प्रशासकाची नियुक्ती केली आहे.