आरे-वारे समुद्रकिनाऱ्यावर आढळला महाकाय व्हेल माशाचा मृतदेह

रत्नागिरी:- कोकण किनारपट्टीवर पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेल्या रत्नागिरीतील प्रसिद्ध आरे-वारे समुद्रकिनाऱ्यावर रविवारी (ता. 26) एका महाकाय व्हेल माशाचा मृतदेह वाहून आला आहे. हा मासा पाण्यात असल्यामुळे त्याला बाहेर काढणे अशक्य असल्याचे कंडाळावन अधिकाऱ्यांनी सांगितले.
रविवारी सायंकाळी हा महाकाय मृत व्हेल मासा आरे-वारे परिसरातील काजीरभाटी किनाऱ्यालगत पाण्यावर तरंगताना काही स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आला. समुद्राच्या लाटांसोबत हा मृतदेह हळूहळू किनाऱ्याकडे सरकत होता. एवढा मोठा मासा किनाऱ्याला लागल्याची बातमी वाऱ्यासारखी पंचक्रोशीत पसरली आणि बघ्यांची किनाऱ्यावर एकच झुंबड उडाली.

या घटनेची माहिती तात्काळ वन विभाग आणि कांदळवन विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. घटनेचे गांभीर्य ओळखून कांदळवन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. व्हेल माशाचा मृतदेह पाण्यात असल्यामुळे त्याला बाहेर काढणे शक्य नव्हते. भरतीच्या लाटांबरोबर व्हेल माशाचा मृतदेह किनाऱ्यावर येण्याची प्रतीक्षा कांदळवन विभाग करत आहे.

हा व्हेल मासा नेमका कोणत्या कारणाने मृत झाला, हे अद्याप समजू शकलेले नाही. समुद्रातील वाढते प्रदूषण, एखाद्या मोठ्या जहाजाची धडक लागल्याने झालेला अपघात की आजारपणामुळे आलेला नैसर्गिक मृत्यू, अशा विविध शक्यता सध्या वर्तवल्या जात आहेत. दरम्यान,कोकण किनारपट्टीवर याआधीही अशा प्रकारे महाकाय मासे मृत अवस्थेत वाहून आल्याच्या घटना घडल्या आहेत, ज्यामुळे सागरी जीवांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.