रत्नागिरी:- तालुक्यातील आरे-वारे बीच आणि भाट्ये बीच या दोन समुद्र किनाऱ्याचा लवकरच कायापालट होणार आहे. पर्यटन विकासाला अधिक गती देण्यासाठी आणि पर्यटकांना जागतिक दर्जाच्या सोयीसुविधा देण्यासाठी सुमारे चार कोटींच्या प्रशासकीय निधीला मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी एक कोटी २० लाखांच्या निधीला प्रत्यक्ष मंजुरी मिळाली आहे. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने या निधी वितरणास अधिकृत मान्यता दिली आहे. यासाठी पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी विशेष प्रयत्न केले होते.
शासनाने मंजूर केलेल्या निधीनुसार, पर्यटकांचे खास आकर्षण असलेल्या आरेवारे किनारा (ता. जि. रत्नागिरी) परिसराचे सुशोभीकरण आणि मूलभूत सुविधा पुरवण्याच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांसाठी दोन कोटींची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्याला अनुसरून ६० लाख रुपयांचा निधी प्रत्यक्ष मंजूर करण्यात आला आहे.
याच धर्तीवर, ऐतिहासिक व निसर्गरम्य भाट्ये बीच (ता. जि. रत्नागिरी) येथे संपूर्ण किनारी सुशोभीकरण व पर्यटकांसाठी अत्याधुनिक नागरी सुविधा निर्माण करण्याच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांसाठी दोन कोटी प्रशासकीय मान्यतेसह ६० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
या विकासकामांमुळे रत्नागिरीतील पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळणार असून, देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. निधी उपलब्ध झाल्याबद्दल स्थानिक ग्रामस्थ आणि पर्यटन व्यावसायिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. या प्रकल्पांमुळे स्थानिक स्तरावर रोजगार निर्मितीलाही वाव मिळणार आहे.
या पायाभूत सुविधांचा अभाव
भाट्ये आणि आरे-वारे किनाऱ्याला पर्यटकांची मोठी पसंती आहे. स्वच्छ आणि अथांग पसरलेले हे किनारे पर्यटकांना भुरळ घालतात; परंतु या ठिकाणी पर्यटकांना पायाभूत सुविधा नाहीत. रस्ते, पार्किंग, फूडस्टॉल, प्रसाधनगृह आदींचा अभाव आहे; मात्र या निधीमुळे ही कमी भरून निघाल्यास रत्नागिरी समुद्रकिनाऱ्याला गोव्याप्रमाणे पर्यटकांची अधिक पसंती मिळेल.









