पर्यटकांना वाचवण्यासाठी रोबोटिक वॉटरक्राफ्टची घेणार मदत
रत्नागिरी:- प्रसिध्द आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ गणपतीपुळेकडे जाणाऱ्या मार्गावरील पर्यटकांची सर्वाधिक गर्दी होणाऱ्या आरे-वारे किनाऱ्यावरील सुरक्षेसाठी पोलिस प्रशासनाकडून ४ होमगार्डस् नेमण्यात आले आहेत. दिवाळी सुट्टीत पर्यटकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाने बुडणाऱ्या पर्यटकांना वाचवण्यासाठी रोबोटिक वॉटरक्राफ्टची मदत घेतली जाणार आहे. हे क्राफ्ट चालवण्याचे प्रशिक्षण होमगार्डस्ना देण्यात आले आहे.
जिल्ह्यातील विस्तीर्ण आणि निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटनाचा आनंद लुटताना होणाऱ्या दुर्दैवी दुर्घटनांना आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलत जिल्हा नियोजन समितीमधून ५ अत्याधुनिक रोबोटिक वॉटरक्राफ्ट खरेदी करण्यात आले आहेत. गणपतीपुळे, गुहागर किनाऱ्यापाठपोपाठ पोहण्यासाठी धोकादायक ठरलेल्या आरे-वारे किनाऱ्यावर रोबोटिक क्राफ्ट ठेवलेला आहे.
रत्नागिरीतील आरे-वारे समुद्रकिनाऱ्यांवर दरवर्षी देशभरातून लाखो पर्यटक येतात. या ठिकाणी समुद्र आणि खाडी एकत्र येत असल्यामुळे येथील परिस्थितीचा अंदाज न आल्यामुळे किंवा पाण्याचा तीव्र प्रवाहामुळे पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला आहे. आतापर्यंत आरे-वारे पुलाजवळ २५हून अधिक पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. ही गंभीर बाब लक्षात घेऊन भविष्यातील अमूल्य मानवी जीव वाचवण्यासाठी तातडीचे बचावकार्य करता यावे, या उद्देशाने रोबोटिक वॉटरक्राफ्ट्सचा समावेश यंत्रणेत करण्यात आला आहे.
रोबोटसारख्या आधुनिक यंत्रणेमुळे पर्यटकांच्या सुरक्षेत मोठी मदत होणार असली तरी पर्यटकांनी स्वतःची काळजी घेऊनच पाण्याच्या प्रवाहात उतरले पाहिजे.– आदेश कदम, पोलिसपाटील, आरे-वारे









