आरे-वारे येथे बुडून झाला होता मृत्यू; आई-वडिलांनी घेतले अंतिम दर्शन
रत्नागिरी:- तालुक्यातील आरे-वारे समुद्रात बुडालेल्या चौघांवर सोमवारी कोकणनगर येथील कब्रस्तानमध्ये दफनविधी करण्यात आल़ा मृत झालेल्या तिघी सख्या बहिणींचे आई-वडिल दुबई येथून येणार असल्याने सोमवारी दफन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान आपल्या लाडक्या मुलींचे सोमवारी आई-वडिल व भाऊ यांनी अंतिम दर्शन घेतले यानंतर दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास दफनविधी पार पडला.
उज्मा शमसुद्दीन शेख (18), हुसेरा शमसुद्दीन शेख (20), जैनब जुनेद काझी (28) व जैनब यांचे पती जुनेद हे शनिवारी सायंकाळी आरेवारे येथील समुद्रात बुडून मृत्यू झाला होता. मुंब्रा येथील रहिवासी असलेल्या शमसुद्दीन यांच्या मुली सुट्टी असल्याने रत्नागिरीत आल्या होत्य़ा तर त्यांचे वडिल हे दुबई येथे गेले होते. घटनेची तातडीने खबर शमसुद्दीन यांना कळविण्यात आली. यानंतर दुबई येथून ते भारतात येण्यासाठी तातडीने रवाना झाल़े दरम्यान चारही मृतदेह रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय येथे ठेवण्यात आले होते.
मुलींचे आई-वडिल रत्नागिरी आल्यानंतर सोमवारी सकाळी मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालय येथून नातेवाईकांनी ताब्यात घेतले. शमसुद्दीन हे मुंब्रा येथील रहिवासी असल्याने मृतदेह त्याठिकाणी नेणार अशी चर्चा सुरुवातीला येत होती. मात्र शमसुद्दीन यांनी रत्नागिरी येथेच दफनविधी करण्याचा निर्णय घेतल़ा सोमवारी दुपारी दफनविधी करण्यात आल़ा यावेळी नागरिकांची मोठी उपस्थिती होती.