रत्नागिरी:- बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार सन 2024-25 या शैक्षणिक सत्रासाठी आरटीई 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत प्राथमिक शिक्षण संचालनालयाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करून त्यांची अंमलबजावणी करण्यात यावी, असे सूचवले आहे. दरम्यान आरटीई प्रवेशासाठी विद्यार्थी नोंदणीची प्रक्रिया पुढील आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे.
आरटीई प्रवेश प्रक्रियेत वंचित, दुर्बल, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग घटकातील मुलांना आरटीईअंतर्गत 25 टक्के राखीव जागावरील प्रवेश प्रक्रियेबाबत प्रवेशासाठी प्राधान्यक्रम ठरवताना विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून एक किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर अनुदानित शाळा, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व स्वयं अर्थसहाय्यित शाळा अशा सर्व प्रकारच्या शाळांचा समावेश आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी यंदापासून केलेला आहे.
ज्या बालकांनी यापूर्वी आरटीई अंतर्गत शाळेत प्रवेश घेतला आहे, अशा बालकांना पुन्हा अर्ज करता येणार नाहीत. प्रवेशासाठी चुकीची माहिती दिली तर संबंधित बालकाचा प्रवेश रद्द करण्यात येईल. पालकांनी एकच परिपूर्ण अर्ज भरावा. अनेक अर्ज भरल्याचे निदर्शनास आल्यास हे अर्ज लॉटरीसाठी विचारात घेतले जाणार नाहीत. अशा पालकांचे अर्ज रद्द करण्यात येतील, याची नोंद घेण्यात यावी. शिक्षणाच्या अधिकारानुसार सन 2024- 25 या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करून काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.
25 टक्के प्रवेशाकरता अल्पसंख्याक शाळांना वगळण्यात आले आहे. तसेच गटशिक्षणाधिकारी स्तरावर प्रवेश प्रक्रियेची कागदपत्रे तपासणीकरता पडताळणी समिती गठित करण्यात येणार आहे. या समितीमार्फत प्रवेशपात्र बालकांच्या प्रवेशासाठी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे, असे प्राथमिक उपशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे यांनी सांगितले.









