Sunday, July 12, 2026
spot_img
Home गुहागर आरजीपीपीएलवर 28 रोजी जप्तीची कारवाई होणार

आरजीपीपीएलवर 28 रोजी जप्तीची कारवाई होणार

जमीन व इमारत कराच्या थकबाकीसाठी अंजनवेल, वेलदूर आणि रानवी ग्रामपंचायतींचा संयुक्त एल्गार

गुहागर:- रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळ वीज प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. जमीन व इमारत कराच्या थकबाकीवरून अंजनवेल, वेलदूर आणि रानवी या तीन ग्रामपंचायतींनी रत्नागिरी गॅस अँड पॉवर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीविरोधात थेट जप्तीची कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत कंपनीसह जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनालाही अधिकृत नोटीस देण्यात आली आहे. याबाबतची माहिती अंजनवेल, रानवि व वेलदूर ग्रामपंचायतींनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत शुक्रवारी देण्यात आली.

सन २००५-०६ पासून रत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनीकडून अंजनवेल, वेलदूर आणि रानवी ग्रामपंचायतींना नियमितपणे जमीन व इमारत कर भरला जात होता. मात्र २०२१-२२ पासून कंपनीने कर भरण्यास नकार दिल्याने वाद निर्माण झाला.
याप्रकरणी पंचायत समिती गुहागरचे तत्कालीन प्रशासक तथा गटविकास अधिकारी यांनी १४ जून २०२२ रोजी कंपनीचे अपील फेटाळून ग्रामपंचायतींना कर वसूल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर कंपनीने जिल्हा परिषद रत्नागिरीकडे अपील केले. मात्र ३ एप्रिल २०२४ रोजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनीही कंपनीचे अपील फेटाळत पंचायत समितीचा आदेश कायम ठेवला.

त्यानंतर कंपनीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र ग्रामपंचायतींच्या म्हणण्यानुसार, उच्च न्यायालयाने जिल्हा परिषदेच्या आदेशाला कोणतीही स्थगिती दिलेली नसल्याने ग्रामपंचायतींना कायद्यानुसार कर वसुलीची कारवाई करण्याचा अधिकार कायम आहे.

ग्रामपंचायतींच्या म्हणण्यानुसार, कराच्या थकबाकीमुळे गावांतील अनेक विकासकामे आणि लोकोपयोगी योजना निधीअभावी रखडल्या आहेत. अनेक बैठका घेऊनही तोडगा न निघाल्याने तीनही ग्रामपंचायतींच्या ग्रामसभा आणि मासिक सभांमध्ये ठराव मंजूर करून २८ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता रत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनीवर जप्तीची कारवाई सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या कारवाईची लेखी नोटीस कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी आणि गुहागर पोलीस ठाण्यालाही देण्यात आली आहे.

दरम्यान, या प्रस्तावित जप्तीच्या कारवाईवर कंपनीची भूमिका काय असेल आणि २८ जुलैपूर्वी तोडगा निघतो का, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.या पत्रकार परिषदेला अंजनवेल, रानवी व वेलदुर या तिन्ही ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.