समुद्रातील दुर्घटना व जीवितहानी रोखण्यासाठी ना. सामंत यांच्या हस्ते हस्तांतरण
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील विस्तीर्ण आणि निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटनाचा आनंद लुटताना होणाऱ्या दुर्दैवी दुर्घटनांना आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अत्यंत महत्त्वाचे व आधुनिक पाऊल उचलले आहे. समुद्रातील बुडणाऱ्यांना तात्काळ जीवनदान मिळावे यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) माध्यमातून खरेदी करण्यात आलेले ५ अत्याधुनिक ‘रोबोटिक वॉटर क्राफ्ट’ पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते आज अधिकृतपणे जिल्हा पोलीस दलाकडे सुपूर्द करण्यात आले.
रत्नागिरीच्या समुद्रकिनाऱ्यांवर दरवर्षी देश-विदेशातून लाखो पर्यटकांची मांदियाळी असते. मात्र, समुद्राचा अंदाज न येणे, भरती-ओहोटीच्या वेळांची माहिती नसणे किंवा पाण्याचा तीव्र प्रवाह यामुळे मागील पाच वर्षांत तब्बल १४३ निष्पाप पर्यटक व नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ही गंभीर बाब लक्षात घेऊन भविष्यातील अमूल्य मानवी जीव वाचवण्यासाठी तातडीचे बचावकार्य करता यावे, या उद्देशाने या ‘लाईफ सेव्हिंग’ रोबोटिक वॉटर क्राफ्ट्सचा समावेश यंत्रणेत करण्यात आला आहे.
हे रोबोटिक वॉटर क्राफ्ट पर्यटकांची सर्वाधिक गर्दी असणाऱ्या किनाऱ्यांवर तैनात केले जाणार आहेत. यात गणपतीपुळे, दापोली (मुरुड-लाडघर पट्टा), गुहागर, आरे-वारे आणि इतर संवेदनशील किनारे यांचा समावेश आहे.
समुद्रात संकटात सापडलेल्या व्यक्तीपर्यंत प्रतिकूल हवामानातही हे रोबोट्स वेगाने पोहोचू शकतात, ज्यामुळे आपत्ती व्यवस्थापन विभागाची कार्यक्षमता दुपटीने वाढणार आहे.
या हस्तांतरण सोहळ्याप्रसंगी आमदार शेखर निकम, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय सूर्यवंशी, चिपळूणचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ, माजी आमदार संजय कदम आदी उपस्थित होते.









