आठवडा बाजार येथे टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

रत्नागिरी:- शहरातील मारुती मंदिर ते आठवडा बाजार जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर रुद्र हॉटेलसमोर एक भीषण अपघात झाला. भरधाव टेम्पोने दुचाकीला धडक दिल्याने ७३ वर्षीय वृद्ध दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजन जयवंत जाधव (वय ७३, रा. शंखेश्वर गार्डन, आरोग्य मंदिर, रत्नागिरी) असे या अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

५ मार्च रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास राजन जाधव हे आपल्या ॲक्टिव्हा दुचाकीने (क्रमांक MH-08-AC-1168) मारुती मंदिरहून आठवडा बाजाराच्या दिशेने जात होते. याच वेळी आरोपी टेम्पो चालक तवाब मोहसीन वाडकर (वय २२, रा. भाट्ये नवानगर, रत्नागिरी) हा आपला टेम्पो (क्रमांक MH-08-BC-2826) घेऊन त्याच मार्गावरून जात होता.

रुद्र हॉटेलसमोर आले असता, टेम्पो चालकाने रस्त्याच्या परिस्थितीचा अंदाज न घेता हयगयीने आणि वेगात वाहन चालवले. यामुळे टेम्पोची धडक दुचाकीला बसली आणि राजन जाधव खाली पडले. दुर्दैवाने टेम्पोचे मागील डावे चाक जाधव यांच्या डोक्यावरून आणि कानावरून गेल्याने त्यांना अत्यंत गंभीर दुखापत झाली आहे.

अपघात घडून काही दिवस उलटल्यानंतर, २१ मार्च रोजी याप्रकरणी रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार दिनेश महादेव हरचकर यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी टेम्पो चालक तवाब वाडकर याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम २८१, १२५ (अ), १२५ (ब) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.