25 ला रत्नागिरीत निदर्शने ; पावसला संघटनांची बैठक
रत्नागिरी:- कोकणातल्या आंबा बागायतदारावषयी कुठल्याही सरकारला आस्था नाही. यासाठी सर्व शेतकर्यांनी एकत्र येऊन शासन दरबारी आपल्या हक्कासाठी 25 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन करण्याचा निर्णय आंबा बागायतदारांनी सर्वानुमते घेतला.
कोकण आंबा बागायतदार संघ, रत्नागिरी जिल्हा अंबा उत्पादक संघ पावस, आंबा उत्पादक संघ आडीवरे यांच्या उपस्थितीत महाकाली पॅलेस येथे ही शनिवारी (ता. 15) सायंकाळी बैठक झाली. यामध्ये प्रामुख्याने शेतकर्यांना येणार्या अडचणी यावर चर्चा झाली. पर राज्यातून येणार्या हापूस आंबा विक्री करणार्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी सर्वांनी केली. यंदा आंबा पिक कमी आल्यामुळे कर्नाटकी आंब्याची मोठ्याप्रमाणात विक्री झाली. तसेच कॅनिंगसाठीही परराज्यातील आंब्याचा वापर झाला आहे. ही बाब गंभीर असून त्याविरोधात योग्य ते पाऊल उचलणे गरजेचे आहे. भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी निर्णय घेतले पाहीजेत. तसेच परदेशामध्येही कोकणातील आंब्याचे उत्पादन घेतले जाते. त्याचे आव्हान भविष्यात निर्माण होणार आहे. त्यासाठी प्रत्येक बागायतदाराने जीआय मानांकन घेतले पाहीजे. त्यासाठी नोंदणी केली पाहीजे. प्रत्येक शेतकर्याने सातबारा, आधार कार्ड, रेशन कार्ड घेऊन आंबा उत्पादक कार्यालयात जमा करण्याचे आवाहन यावेळी बावा साळवी यांनी केले.
आंबा पिक कमी येऊनही कोकणातल्या शेतकर्यांच्या प्रश्नांवर सरकारकडून लक्ष देण्यात आलेले नाही. यावरुन आंबा बागायतदारांबद्दल जरा देखील आस्था नसल्याचे दिसते. पालकमंत्र्यानीही तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेण्याचे आश्वासन दिले. परंतु तसे झालेले नाही. त्यामुळे अधिवेशन सुरु झाल्यानेतर सर्व बागायतदारांनी एकत्र येऊन शासन दरबारी न्याय मिळावा यासाठी 25 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन करण्याचा निर्णय घेतला. यावेळी जिल्ह्यातील सर्व आंबा बागायतदार, आंबा उत्पादक यांनी हजर राहण्याचा आव्हान करण्यात आले आहे. या बैठकीला प्रकाश साळवी, नंदकुमार मोहिते, दत्ताशेठ तांबे, राजू जाधव, मंगेश साळवी, राजू पेडणेकर, अॅड. महेंद्र मांडवकर, सचिन आचरेकर यांच्यासह रत्नागिरी जिल्हा आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष प्रदिप सावंत आणि अन्य आंबा बागायतदार उपस्थित होते.