Sunday, October 11, 2026
spot_img
Home रत्नागिरी आंबा घाटात ‘एरडॉक्स प्लेट्स’ तंत्रज्ञानाचा वापर

आंबा घाटात ‘एरडॉक्स प्लेट्स’ तंत्रज्ञानाचा वापर

वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न

रत्नागिरी:- मुसळधार पावसामुळे आंबा घाटात दरड कोसळून रस्ता खचल्याने ठप्प झालेल्या वाहतुकीवर कायमस्वरूपी आणि जलद उपाय शोधण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाने पावले उचलली आहेत. आंबा घाटात खचलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी एरडॉक्स प्लेट्सचा वापर केला जाणार आहे. खचलेला रस्ता पुन्हा भक्कम करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असून, गणेशोत्सवापूर्वी हे दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत.

आंबा घाटात रस्ता खचल्यानंतर पुण्यातील कंपनीने मातीचे नमुने घेतले होते. या प्रकल्पाची जबाबदारी रेल्वेच्या कामाचा दांडगा अनुभव असलेल्या ‘मॅकफेरी’ या कंपनीकडे सोपवण्यात आली आहे. घाटातील ज्या भागाची माती खचली होती तेथील नमुने गोळा करून तज्ज्ञांकडून तांत्रिक चाचण्या पूर्ण केल्या आहेत. या भागात सर्वत्र ५ मीटर मातीचा थर असून, त्या खाली मजबूत कातळ आहे. जमिनीच्या स्तरानुसार आवश्यक त्या उपाययोजना केल्या जाणार आहेत.

याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाचे क्वांटिटी सर्व्हेअर अमित वरोटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबाघाटात खचलेल्या रस्त्याच्या ३० मीटर लांब आणि पाच मीटर उंचीच्या भागात नेहमीच्या सिमेंट भिंतीऐवजी एरडॉक्स प्लेट्सचा वापर केला जाणार आहे. सर्वप्रथम खचलेल्या भागातील सध्याच्या माती व भरावाला नेलिंग आणि ग्राउटिंग करून ताकद दिली जाईल.

त्यानंतर दरीच्या बाजूने एरडॉक्सच्या विशेष प्लेट्स लावून त्याला आडव्या पद्धतीने होरिझोन्टली नेल्सद्वारे जोडले जातील. या संरचनेमुळे खाली जास्त बेस (पाया) तयार न करता थेट होरिझोन्टल लोड बॅकफिलवर दिला जाईल. त्यातून पाण्याचा सहज निचरा होत असल्याने हा भराव खचणार नाही तसेच मातीची धूप रोखण्यासाठी खालील स्लोपवर हायड्रो सिडिंगसारख्या तंत्रज्ञानाने माती घट्ट पकडून ठेवली जाणार आहे.

नेहमीच्या पद्धतीनुसार भिंत बांधण्यासाठी मोठा कालावधी लागतो; मात्र हे तंत्रज्ञान आपत्कालीन स्थितीत जलद काम करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. या कामासाठी कमी कालावधी लागतो. पावसाने थोडी साथ दिल्यास गणेशोत्सवापूर्वी हा रस्ता पूर्णक्षमतेने सुरक्षित आणि वाहतुकीसाठी सज्ज केला जाईल अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाचे क्वांटिटी सर्व्हेअर अमित वरोटे यांनी दिली.