अधिक रिक्त पदांमुळे फटका; भरतीनंतरच पुढील प्रक्रिया
रत्नागिरी:- जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांची रिक्त पदे दहा टक्केपेक्षा अधिक असल्यामुळे आंतरजिल्हा बदलीने जाण्यास पात्र ठरलेल्या ४८९ शिक्षकांना बदलीच्या ठिकाणी सोडू नये असे पत्र शासनाकडून प्राप्त झाले आहे. त्यामुळे बदली झालेल्या शिक्षकांना सोडण्यात येणार नाही असे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी सांगितले. या निर्णयामुळे गावाच्या ठिकाणी जाण्याचा या शिक्षकांचा मार्ग यंदा बंद राहणार आहे. शिक्षण विभागाकडूनही रिक्त पदांचा तपशील ग्रामविकास विभागाला सादर केला आहे.
प्राथमिक शिक्षकांची बदली प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने केली जात आहे. त्याची प्रक्रिया मागील महिन्यात पुर्ण झाली होती. प्रथम आंतरजिल्हा बदलीचे प्रस्ताव मागविण्यात आले होते. रत्नागिरी जिल्ह्यातील ४८९ शिक्षकांनी बदलीसाठी ऑनलाईन माहिती भरली होती. त्यातील ४८९ शिक्षक आंतरजिल्हा बदलीसाठी पात्र ठरले. सर्वाधिक शिक्षकांनी पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगलीसह आजूबाजूच्या जिल्हा परिषदांची मागणी केली होती. जिल्हा परिषदेच्या पावणेतीन हजार शाळांमध्ये मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख आणि शिक्षकांची दहा टक्केपेक्षा अधिक पदे रिक्त आहेत. त्यामध्ये मराठी माध्यमातील शिक्षकांची ६ हजार ६८९ पदे मंजूर असून त्यातील ५ हजार ७५० पदे भरलेली आहेत. ९३९ पदे रिक्त आहेत. १४.४ टक्के हे प्रमाण आहे. उर्दू माध्यमात ४७७ पदे मंजूर असून ३९० भरलेली आहेत. ८७ पदे रिक्त असून हे प्रमाण १८.२४ टक्के आहे. केंद्र प्रमुखांची २५१ पैकी ८२ पदे भरली गेली आहेत. १६९ पदे रिक्त असून ६७.३३ टक्के प्रमाण आहे. मुख्याध्यापकांची अवघी १९ पदेच भरलेली आहेत. मंजूर ६६ पैकी ४७ म्हणजेच ७१.२१ टक्के पदे रिक्त आहेत.
आंतरजिल्हा बदलीने मागील प्रकियेवेळी मंजूर तिनशे जणांना अजुनही रिक्त पदांमुळे बदलीच्या ठिकाणी सोडण्यात आलेले नाही. यंदा त्यात ४८९ जणांची भर पडली आहे. पात्र शिक्षकांना परजिल्ह्यात सोडले तर रत्नागिरी जिल्ह्यात रिक्त पदांमध्ये मोठी भर पडेल. त्याचा परिणाम शैक्षणिक गुणवत्तेवर होणार असून आजही ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद शाळांचा आधार आहे. इंग्रजी माध्यमाकडील पालकांचा कल वाढत असल्यामुळे जिल्हा परिषद शाळांमधील पट कमी होत असल्याने शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे त्यात मोठी घसरण होऊ शकते. ग्रामविकास विभागानेही रिक्त पदांची संख्या अधिक असल्यामुळे आंतरजिल्हा बदलीने पात्र ठरलेल्यांना सोडू नये असे पत्र दिले आहे. त्यामुळे बदली होऊन संबधित शिक्षकांना जिल्ह्यातच राहावे लागाार आहे.









