ग्रामविकासचे आदेश; बदली झाली तरीही मुक्ततेसाठी प्रतिक्षाच
रत्नागिरी:- आंतरजिल्हा बदली प्रक्रियेसाठी रत्नागिरी जिल्ह्याचा पोर्टलवर समावेश करण्याचे आदेश ग्रामविकास विभागाकडून काढले आहेत. त्यामुळे आंतरजिल्हा बदलीसाठी इच्छुक शिक्षकांना दिलासा मिळाला आहे; परंतु शिक्षकांची बदली झाली तरीही त्यांना सोडण्याचा निर्णय प्रशासनावर अवलंबून राहणार आहे. रिक्त पदांची संख्या लक्षात घेऊन त्यावर कार्यवाही करण्यात येणार आहे.
दहा टक्केपेक्षा जास्त शिक्षकांची पदे रिक्त असतील त्यांना आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत समावीष्ट करुन घेण्यात आलेले नव्हते. संबंधित पोर्टलवर त्या जिल्ह्याचे नाव समावीष्ट केलेले नव्हते. राज्यातील रत्नागिरी आणि पालघर या दोनच जिल्ह्यांचा समावेश होता. यासंदर्भात रत्नागिरीत नव्याने स्थापन केलेल्या महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेकडून आवाजही उठवण्यात आलेला होता. यासंदर्भात रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष दिलीप देवळेकर यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे साकडे घातले होते. रिक्त पदांमधील तांत्रिक त्रुटीही त्यांना समजावून सांगण्यात आल्या होत्या. त्या त्रुटी दुर केल्यास रत्नागिरी जिल्हा परिषदेतील रिक्त पदांची संख्या दहा टक्केपेक्षा खाली येईल. तसेच राज्य शासनाच्या स्थानिकस्तरावरील भरती करण्याच्या अदेशाची अंमजबजावणीही जिल्ह्यात होऊ शकते असे श्री. देवळेकर यांनी सांगितले. राज्य शिक्षक सेनेच्या प्रयत्नांना यश आले असून शासनाने आंतरजिल्हा बदलीच्या प्रक्रियेत शिक्षकांचा समावेश करुन घेण्यास मंजूरी दिली आहे. याबाबतचे पत्र बुधवारी (ता. 1) जिल्हा परिषद शिक्षण विभागाला प्राप्त झाले आहे. याचा फायदा जिल्ह्यातील 1200 शिक्षकांना होणार आहे. या विषयासाठी जिल्हा सरचिटणीस सुरेंद्र रणसे, तालुकाध्यक्ष सुहास भितळे, राजापूर तालुका अध्यक्ष मेघनाथ गोसावी, संगमेश्वर तालुका उपाध्यक्ष रवींद्र दरडी, जिल्हा सहसचिव दीपक कदम यांनी विशेष प्रयत्न केले होते.