अशैक्षणिक कामांमुळे शिक्षक बेजार; शिक्षण मिळत नसल्याने विद्यार्थी हैराण

रत्नागिरी:- जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा राज्यात दर्जेदार असल्या तरी सध्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तब्बल दोन हजार पदे रिक्त आहेत. त्यात अशैक्षणिक कामांमुळे शिक्षक बेजार झाले आहेत. या कामांमुळे शिक्षकांना शाळेत शिकवण्यासाठी वेळच मिळत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यामुळे ‘ओ सर, परीक्षा आलीय… आम्हाला शिकवा’ अशी मागणी विद्यार्थी वर्गातून होत आहे.

शिक्षण विभागात सध्या अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यांना समस्यांचे लागलेले ग्रहण सुटता सुटेना अशी स्थिती निर्माण झाली आहे. शेवटी याचा परिणाम शैक्षणिक गुणवत्तेवर हळुहळू जाणवू लागला आहे. गेली काही वर्षे रत्नागिरी जिल्हा हा शैक्षणिक दर्जामध्ये राज्यात अग्रेसर आहे. मुळात रिक्त पदांची संख्या जास्त असल्याने कारभार चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. आंतरजिल्हा बदली व नियमित सेवानिवृत्त शिक्षकांमुळे रिक्त पदांची संख्या वाढत आहे. सध्या दोन हजारपेक्षा जास्त रिक्तपदे आहेत. त्यात शिक्षक भरतीचा अजूनही पत्ताच नाही. यामुळे रिक्त पदांची संख्या दिवसेंदिवस वाढतच निघाली आहे.

रिक्तपदांमुळे शाळेवर शिकवण्यासाठी शिक्षकच नसल्याचे चित्र आहे. काही शाळेत तर पहिली ते सातवीपर्यंत शिकवण्यासाठी एक किंवा दोनच शिक्षक आहेत. त्यात प्राथमिक शिक्षकांना अशैक्षणिक कामांना गुंतवले आहे. यामुळे शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी वेळच नसल्याचे दिसून येत आहे. शेवटी याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर होताना दिसून येत आहे.

नवीन शैक्षणिक वर्षाला 15 जून 2023 पासून सुरूवात झाली. प्राथमिक शाळा सुरू होताच शाळांमधून विद्यार्थ्यांकरीता विविध परीक्षांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये सेतू पूर्व चाचणी, सेतू उत्तर चाचणी, अध्ययन स्तर निश्चिती चाचणी अशा विविध परिक्षामधून तिमाहीचे मूल्यमापन करण्याचे निश्चित होईल असे कळविण्यात आले. परंतु जिल्हा परिषदेला जून, जुलै महिना संपल्यानंतरही याबाबतचे नियोजन अद्याप करता आलेले नाही. कधी शिक्षकांना परीक्षा घ्या म्हणून आदेश करतात, तर कधी शिक्षकांना आदेश परीक्षा घेऊ नका म्हणून आदेश केला जातो आहे.
परीक्षांचे गुण भरण्यासाठी गडबड केली गेली आणि या गडबडीतूनच अनेक शिक्षकांनी ‘व्ही स्कूल’ नावाच्या अ‍ॅपमध्ये सेतू पूर्व चाचणी या पूर्ण झालेल्या चाचणीचे गुण अद्ययावत केले आहेत.

हे काम पूर्ण केले नाही तर संबंधित शिक्षकाला शिक्षेस पात्र व्हावे लागेल, अशा प्रकारची भूमिका प्रशासनाने घेतली होती. आज दिनांक 3 ऑगस्ट 2023 रोजी पुन्हा एकदा केंद्रप्रमुखांच्यामार्फत या अ‍ॅपमध्ये माहीती न भरण्याचे व परीक्षा न घेण्याचे आदेश आले आहेत. डाएटमार्फत विविध उपक्रम राबवले जात
आहेत.

या कामांबरोबरच निवडणुकीचे तसेच साक्षरनिरक्षर कार्यक्रमाचीही जबाबदारी शिक्षकांवर देण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षकांनी शाळेत शिकवायचे तरी कधी? असा मोठा प्रश्न आहे. आता सहामाही परीक्षा जवळ आली तरी अनेक ठिकाणी 20 टक्के अभ्यासक्रम शिकवून झालेला नसल्याचे दिसून येत आहे.