रत्नागिरी:- राज्यासह कोकणच्या किनारपट्टीवर मासेमारी करणार्या परप्रांतीय नौकांसह अवैधरित्या मासेमारी करणार्या स्थानिक नौकांवर ड्रोनद्वारे वॉच ठेवला जातोय. गेल्या तीन महिन्यात ड्रोनने २९५ नौकांना दोषी ठरवले आहे. त्यामध्ये ३० परराज्यातील नौकांचा समावेश आहे. तर ५० नौकांवरील खटले निकाली काढत त्यांना ३१ लाख १२ हजार रु.चा दंड करण्यात आला आहे. तर उर्वरित नौका चालकांवर लवकरच दंडांचा बडगा उभारला जाणार आहे.
राज्यासह कोकण, रत्नागिरीच्या सागरी हद्दीत घुसून कर्नाटकसह अन्य राज्यातील नौका धुमाकूळ घालत होत्या. समुद्रात त्यांची मुजोरी वाढली होती. त्यांच्याकडून स्थानिक मच्छीमारांना मारहाणही केली जात होती. तर कोकण किनार्यावरील मच्छी लांबवण्याचे काम त्यांच्याकडून सुरू होते.
परप्रांतीय नौकांवर वॉच ठेवण्यासह स्थानिक अवैधरित्या मासेमारी करणार्या नौकांवर कारवाई करण्यासाठी किनारपट्टीवरील हर्णै (दापोली), नाटे (राजापूर), रत्नागिरी या तीन ठिकाणी ड्रोन लावण्यात आले आहेत. त्याद्वारे समुद्रातील हालचाली टिपल्या जात आहेत. तीन ड्रोनच्या सहाय्याने दि.९ फेब्रुवारी २०२५ पासून २९५ नौकांवर केसेस दाखल करण्यात आल्या आहेत.
ड्रोनद्वारे किनारपट्टी भागात मासेमारी करणार्या परराज्यातील नौका शोधल्या जातात. आतापर्यंत ३० नौकांची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असून त्या कर्नाटक राज्यातून मासेमारीसाठी कोकणात येत असल्याचे स्पष्ट झाले आहेत. तर १० नॉटीकलच्या आत ट्रॉलर तर १२ नॉटीकलच्या आत मासेमारी करणार्या पर्ससीन नौकांसह एलईडी नौकांवर कारवाई केली जाते.
आतापर्यंत २९५ नौकांवर कारवाई करण्यात आली. त्यातील ५० नौकांवरील गुन्ह्याची सुनावणी पूर्ण होऊन त्यांना ३१ लाख १२ हजार रु.चा दंड करण्यात आला. त्यातील ११ लाख ९२ हजार रु. दंडाची रक्कम सरकारी तिजोरीत जमा करण्यात आली आहे. उर्वरित दंड जमा करण्याचे काम मत्स्य व्यवसाय विभागाकडून सुरू आहे. तर शिल्लक राहिलेल्या २४५ गुन्ह्यांची सुनावणी मत्स्य विभागाकडे सुरू आहे.