अवघ्या दोन महिन्यात वाटद सरपंच अंजली विभूते स्वगृही शिवसेनेत

रत्नागिरी:- ना. सामंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जयगड पंचक्रोशीतील वाटद ग्रामपंचायतीमध्ये करिष्मा करून दाखवला आहे. ना. सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत सरपंच अंजली विभूते यांनी ना. सामंत यांच्या उपस्थितीत अवघ्या दोन महिन्यात पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला आहे.

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत वाटद ग्रामपंचायतीमध्ये सरपंच निवडणुकीत धक्कादायक निकाल समोर आला. या ग्रामपंचायतीमधील 11 पैकी 7 जागा सेनेकडे तर 4 जागा भाजपकडे आल्या.  वाटद ग्रामपंचायतीमध्ये काटावरचे बहुमत असताना भाजपने या ठिकाणी करिश्मा करून दाखविला. शिवसेनेचे दोन सदस्य भाजपने गळाला लावले आणि त्यांच्या मदतीने या ग्रामपंचायतीवर भाजपने कब्जा मिळविला. सरपंचपदी अंजली विभुते तर उपसरपंचपदी सुप्रिया नलावडे या विराजमान झाल्या होत्या. 
 

मात्र अवघ्या दोनच महिन्यात अंजली विभूते यांनी सेनेत प्रवेश केला आहे. उपजिल्हा प्रमुख बाबू म्हाप, तालुका प्रमुख प्रदीप उर्फ बंड्या साळवी आणि इतर पदाधिकारी यांनी ना. सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली वाटद ग्रामपंचायत पुन्हा सेनेकडे वळवण्यात यश मिळवले असून सेनेच्या या रणनीतीने भाजपला मोठा धक्का बसला आहे.