Sunday, October 18, 2026
spot_img
Home रत्नागिरी अरबी समुद्रात चक्रीवादळाची निर्मिती; रत्नागिरीहून वादळ मुंबईच्या दिशेने सरकणार!

अरबी समुद्रात चक्रीवादळाची निर्मिती; रत्नागिरीहून वादळ मुंबईच्या दिशेने सरकणार!

१६ ते २१ ऑक्टोबरदरम्यान मुसळधार पावसाची शक्यता

रत्नागिरी:- अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र वेगाने तीव्र होत असून, आगामी सोमवारी (२६ ऑक्टोबर) रत्नागिरीच्या समुद्रात भयंकर चक्रीवादळ आकारास येण्याची तीव्र शक्यता हवामान शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे. हे चक्रीवादळ रत्नागिरीच्या सागरी क्षेत्रातून अधिक वेग घेत उत्तर-पश्चिम दिशेने थेट मुंबईच्या रोखाने सरकणार असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या संभाव्य सागरी घडामोडींमुळे शुक्रवारपासूनच महाराष्ट्रातील हवामानात नाट्यमय बदल होऊन अनेक भागांत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

सप्टेंबरमध्ये वर्तवलेला अंदाज ठरतोय खरा!

यंदा परतीचा मान्सून माघारी फिरताच अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात सलग तीन चक्रीवादळे धडकणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासकांनी सप्टेंबर महिन्यातच व्यक्त केला होता. त्या अंदाजानुसार, या मालिकेतील पहिलेच चक्रीवादळ आता रत्नागिरीजवळ अरबी समुद्रात आकार घेत आहे. या चक्रीवादळाच्या तीव्र प्रभावामुळे राज्यातील विविध भागांत १६ ते २१ ऑक्टोबर दरम्यान विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कोकण किनारपट्टी व मुंबईसाठी हाय अलर्ट!

रत्नागिरीच्या सागरात तयार होणारे हे वादळ मुंबईच्या दिशेने पुढे सरकणार असल्याने संपूर्ण कोकण किनारपट्टीवर धोक्याची घंटा वाजली आहे. समुद्रात निर्माण होणाऱ्या या वादळी स्थितीमुळे किनारपट्टी भागात प्रचंड वेगाने वारे वाहणार आहेत. या पार्श्वभूमीवर मच्छीमारांनी समुद्रात न उतरण्याचे संकेत देण्यात आले असून, स्थानिक प्रशासनालाही आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.