अधिकारी, कर्मचारी, अभ्यागतांसाठी जिल्हा परिषदेत दवाखाना

रत्नागिरी:- जिल्ह्य़ाया ग्रामीण विकासाचा कारभार हाकला जात असताना या भवनात कामाच्या धावपळीत असलेल्या कर्मचाऱ्यांची यापुढे जि.प.प्रशासन काळजी घेणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषद मध्ये काम करणारे अधिकारी व कर्मचारी तसेच जिल्हा परिषदमध्ये कामानिमित्त येणारे अभ्यागत, पत्रकार यांना आरोग्यसेवा मिळावी या उद्देश्याने येथे उपचार सेवेसाठी दवाखाना सुरू करण्यात आला आहे.

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पूजार यांच्या संकल्पनेतून व त्यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषद इमारतीत दवाखान्याचे सोमवारी उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) विजयसिंह जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.प) राहुल देसाई, मुख्य लेखा व वित्त अधिकारी उत्तम सुर्वे, जिल्हा आरोग्स अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. पल्लवी पगडाल, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुवर्णा सावंत, पं. स. रत्नागिरी गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव तसेच सर्व खाते प्रमुख अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हा परिषद येथे सुरू करण्यात आलेल्या या दवाखान्यामध्ये डॉ. देविदास चरके हे वैद्यकिय अधिकारी कार्यरत राहणार आहेत. या दवाखान्याची वेळ ही सकाळी 11 ते दुपारी 2 अशी ठेवण्यात आली आहे. तरी जिल्हा परिषद मधील सर्व अधिकारी व कर्मचारी, अभ्यागत, पत्रकार यांनी आरोग्यसेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पूजार यांनी केले आहे.