अकरावी ऑनलाइन प्रवेशाची वेबसाईट पहिल्याच दिवशी क्रॅश

रत्नागिरी:-  राज्यात अकरावी प्रवेशाची ऑनलाइन प्रक्रिया बुधवार पासून सुरू झाली आहे. सकाळी 11 वाजल्यापासून ही प्रक्रिया सुरू होण्याची अपेक्षा होती. विद्यार्थ्यांना आजपासून कॉलेज पसंतीक्रम आणि प्रवेश अर्ज ऑनलाइन भरता येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, पहिल्याच दिवशी शिक्षण मंडळाची वेबसाईट क्रॅश झाली आहे. संकेतस्थळ उघडताच अनेक तांत्रिक अडचणी निर्माण होत असून अनेकांचं लॉगिन होत नसल्याचे दिसून आले. तर काही ठिकाणी भरलेली माहिती सेव्ह होत नसल्यामुळे अकरावी प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना अर्ज भरताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अर्ज प्रक्रियेचा पहिलाच टप्पा रखडल्याने पालकांसह विद्यार्थ्यांचा मनस्ताप वाढलाय. शिक्षण विभागाकडून या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू असून, प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरळीत होईल, असं शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केलं आहे.

अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत संकेतस्थळ डाऊन
अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या वेबसाईट मध्ये तांत्रिक अडचणी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत.अकरावी प्रवेश प्रक्रिया यंदा पहिल्यांदाच संपूर्ण राज्यात ऑनलाइन पद्धतीनं राबविण्यात येतेय. त्यामुळं एका अर्जातच राज्यभरातील महाविद्यालयांतील प्रवेशाचा पर्याय उपलब्ध झालाय. मात्र, पहिल्याच दिवशी विद्याथ्यांना ऑनलाइन प्रवेशाच्या संकेतस्थळावर तांत्रिक अडचणी येत असल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करता येत नाहीये. यावर शिक्षण संचालनालायकडून ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरळीत करण्यासंदर्भात काम सुरू आहे

विद्यार्थ्यांना आजपासून कॉलेज पसंतीक्रम नोंदवून ऑनलाइन अर्ज भरता येणार होता. मात्र संकेतस्थळ वारंवार डाऊन होत असल्याने विद्यार्थ्यांचे लॉगिन होत नाहीये, भरलेली माहिती सेव्ह होत नाहीये आणि अर्ज प्रक्रियेचा पहिलाच टप्पा रखडला आहे. ही समस्या केवळ विद्यार्थ्यांपुरती मर्यादित नसून, महाविद्यालयांतील नोंदणीसाठी जबाबदार कर्मचाऱ्यांनाही तांत्रिक अडथळ्यांमुळे त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार पालकांसह विद्यार्थी करत आहेत. परिणामी, पहिल्याच दिवशी अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.